मुंबई- अश्विनी जोशी या ठाण्याच्या जिल्हाधिकारी असताना त्यांनी बेकायदा रेती उपसा विरोधात कारवाई केली. त्यामुळे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याशी त्यांचे बिनसले होते.
राज्य सरकारने गुरुवारी दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन, मंत्रालय, सचिव अश्विनी जोशी यांची बदली मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. जोशी या भाजपाच्या मर्जीतील अधिकाऱ्यापैकी एक मानल्या जातात. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जोशी यांना ठाकरे गटाच्या शिवसेनेला शह देण्यासाठी या महापालिकेत आणले असल्याचे बोलले जाते.
गुरुवारी झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे – गृह विभाग, मंत्रालय खासगी सचिव डी. टी. वाघमारे (१९९४ तुकडी) यांची वैद्यकीय शिक्षण आणि औषधे विभाग, मंत्रालय खासगी सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन, मंत्रालय, सचिव अश्विनी जोशी (२००६ तुकडी) यांची बदली मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक ही भाजपासाठी प्रतिष्ठेचा विषय झालेली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा जीवाचा आटापिटा करत आहे. यासाठीच मुंबई महापालिकेत कौशल्य विकास मंत्री असलेल्या मंगल प्रभात लोढा यांना स्वतंत्र दालन देण्यात आले आहे. असे असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेला शह देण्यासाठी अश्विनी जोशी यांना मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर आणले असल्याची चर्चा मंत्रालयात होती. अश्विनी जोशी या ठाणे जिल्हाधिकारी असताना त्यांनी बेकायदा रेती उपसा विरोधात कारवाई केली. त्यामुळे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याशी त्यांचे बिनसले होते.
राज्य सरकारने २० जुलै २०२३ रोजी ४१ हून अधिक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या कार्यालयात सहसचिव असणाऱ्या राजेंद्र क्षीरसागर यांची मुंबईचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. यापूर्वी राजीव निवतकर हे मुंबईचे जिल्हाधिकारी होते. कोकण विभागातील उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख यांची आता क्षीरसागर यांच्या जागी मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जूनमध्ये मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी रुजू झालेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली होती. ते आता कृषी विभागाचे सचिव आहेत. १९९६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी संजय खंदारे यांची मंत्रालयात पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांची बीएमसीमध्ये सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापुरातील जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांची मुंबईत अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.