जनशक्तीचा दबाव न्यूज | भांबेड | मार्च ११, २०२३.
लांजा तालुक्यातील विविध विकासकामांचा सातत्याने सरकारदरबारी पाठपुरावा करून ती भरघोस निधीसहित मंजूर करून घेण्याचा यशस्वी प्रयत्न करणार्या उल्का विश्वासराव यांच्या प्रयत्नांमुळे लांजा तालुक्यासाठी तब्बल १० कोटींची भरभक्कम तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी केली. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांनी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन केले. यासाठी उल्का विश्वासराव यांचा प्रातिनिधिक स्वरूपात भांबेड येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी गौरव केला.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारी विकासकामे उल्का विश्वासराव यांनी मंजूर करून आणल्याने कार्यकर्ते व जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आजच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने जनतेच्या त्यांच्याकडून असणार्या अपेक्षा द्विगुणित झाल्याचे स्पष्ट होत आहे. भांबेड कोलेवाडी मौजे मांजरे गावडी घाटरस्ता सर्वेक्षणासाठी रूपये १ कोटीचा निधी, शिपोशी हरिहरेश्वर मंदिर येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी रूपये ५ कोटी तर प्रभानवल्ली खोरनिनको महालक्ष्मी येथे पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी रूपये निधी मंजूर झाला असून या तिन्ही विकासकामांसाठी मा. उल्का विश्वासराव यांनी निवेदने देऊन आणि पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. याच दूरदृष्टी असलेल्या कर्तबगार महिलेचा सन्मान करण्यासाठी आज जनसंपर्क कार्यालयात श्री. महेश इंदुलकर, श्री. महेश गांगण, श्री. श्रीकांत ठाकूरदेसाई, श्री. चंद्रकांत मांडवकर, श्री. कमलाकर शिवगण, श्री. सुनील गुरव, श्री. अमोल रेडिज, श्री. अतुल गुरव, श्री. संजय चव्हाण, श्री. संदेश गुरव, श्री. शंकरशेठ गांधी, श्री. सचिन शिवगण, श्री. प्रमोद गुरव, श्री. महादेव गुरव, श्री. रूपेश मोरे, श्री. पंढरीनाथ धनावडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना उल्का विश्वासराव म्हणाल्या, “आपण माझा सन्मान केलात याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा सत्कार मा. देवेंद्रजी व मा. रविंद्र चव्हाण साहेबांचा असून तो मी नम्रपणे स्विकारत आहे. अजून आपल्याला बरेच काम करायचे आहे. मा. पंतप्रधान मोदीजींचे दूत म्हणून काम करणे हाच मोठा सन्मान आहे. आपण या विकासयात्रेत सर्वजण यात्रेकरू म्हणून सहभागी होऊन आपला लांजा तालुका सर्वार्थाने विकसित करू.”