महाराष्ट्र प्रवक्ता न्यूज | रत्नागिरी | ऑक्टोबर ०५, २०२३.
भाजपाची रत्नागिरी (दक्षिण) तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. तालुकाध्यक्ष संयोग (दादा) दळी यांच्या नेतृत्त्वाखाली तयार करण्यात आलेल्या या कार्यकारिणीमध्ये नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून प्रत्येक कार्यकर्त्याला गुणवत्ता, निष्ठा आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षकार्यासाठी वेळ देण्याची तयारी या गोष्टींचा प्राधान्याने विचार करून जबाबदारी देण्यात आली आहे.
ग्रा.पं. पूर्णगडचे माजी उपसरपंच व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. प्रकाश पवार यांची अनुसूचित जातीजमाती मोर्चा रत्नागिरी (दक्षिण) तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे पक्ष संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील सहकारी, आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात येत असून भावी वाटचालीसाठी शुभकामना व्यक्त करण्यात येत आहेत. श्री. प्रकाश पवार यांचा सहकार क्षेत्रात काम करण्याचा दांडगा अनुभव असून विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदाची धुरा सांभाळली आहे.
भाजपाच्या अनुसूचित जातीजमाती मोर्चा रत्नागिरी (दक्षिण) तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी पक्ष संघटनेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार बाळासाहेब माने, तालुकाध्यक्ष श्री. दादा दळी यांचे आभार मानले. तसेच आपली निवड सार्थ ठरवण्यासाठी अथक परिश्रम करण्याचे अभिवचन दिले.