‘उमेद’च्या ‘सरस’ प्रदर्शनाला भाजपा नेते बाळ माने व महिला पदाधिकाऱ्यांची भेट, गणपतीपुळ्यात गणरायास घातले महाविजयाचे साकडे…!

Spread the love

गणपतीपुळे/डिसेंबर/३०/२०२३- भाजपा नेते, रत्नागिरीचे माजी आमदार व रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांनी आज गणपतीपुळे येथे उमेद संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सरस’ प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, सौ. माधवी माने तसेच महिला मोर्चाच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. बाळ माने व सुजाता साळवी यांनी सरस प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांच्या स्टॉलला भेटी देऊन त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली. व्यवसायाची स्थिती जाणून घेत येत असलेल्या समस्या जाणून घेतल्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून या समस्यांचे निराकरण कशाप्रकारे करता येऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांचे कौतुक केले. यासोबत त्यांनी महिलांना बचतीचे महत्व समजावून सांगताना अडीअडचणीसाठी काही रक्कम आपल्या जनधन खात्यात नियमितपणे जमा करावी असे सांगितले. या रकमेवर व्याज तर मिळेलच पण अतिशय गरजेच्या वेळी हीच पुंजी कामी येईल असा विश्वास त्यांनी महिलांना दिला. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्याइतके महिलांना आजवर कोणीही प्राधान्य दिले नाही. ‘सशक्त नारी, समृद्ध नारी’ असा घोष करत मोदीजींनी ६०% हून अधिक योजना महिलांना केंद्रस्थानी ठेऊन केल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

बाळ माने यांच्यासोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी गणरायाचे दर्शन घेत कोकणच्या समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली. “कोकणाचा मुख्यत्वे रत्नागिरीचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी आणि महत्त्वाकांक्षा केवळ भाजपाकडे आहे हे आता लोकांच्या लक्षात येत आहे. गेली अनेक वर्षे संपूर्ण कोकण शाश्वत विकासासाठी तळमळत आहे. आता ही संधी महाविजय २०२४ च्या निमित्ताने चालून आली आहे. यावेळी ‘पंचायत से पार्लमेंट’ तक भाजपाच्या राष्ट्रीय विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना कोकणाची सेवा करण्याची संधी तुझ्या कृपेने प्राप्त होऊ दे. कोकणच्या जनतेचा अमोघ विश्वास संपादन करण्यात, तो टिकवण्यात आणि उत्तरोत्तर वृद्धिंगत करण्यात मा. मोदीजींच्या तसेच मा. देवेंद्रजींच्या नेतृत्त्वात आम्हा सर्व बालगोपाळांना यश मिळू दे.” असे साकडे श्रीगणेशाकडे घालण्यात आले.

यावेळी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील मुख्य पुजारी, भाजपाचे युवा उपाध्यक्ष श्री. अभिजीत घनवटकर गुरुजी, श्री. चैतन्य घनवटकर गुरुजी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा वर्षा राजे निंबाळकर, सरचिटणीस सौ. वर्षा ढेकणे, रत्नागिरीच्या मा. नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ, सौ. संपदा तळेकर, सौ. सायली बेर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच उमेदचे पदाधिकारी, महिला व्यावसायिक तसेच प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page