चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील (अनौपचारिक) कसोटी सामन्यात इतिहास रचला गेला. १३ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीयानं ५८ चेंडूत शतक झळकावत ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढली. १० वर्षांखालील कसोटी सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. तर, जागतिक पातळीवरील दुसरा खेळाडू ठरला आहे.
अविश्वसनीय प्रतिभेमुळं वैभव भारतीय निवडकर्त्यांच्या रडारवर आहे. त्याच्यापेक्षा ५ किंवा ६ वर्षांनी मोठ्या खेळाडूंसह आणि विरुद्ध खेळण्यासाठी तो सज्ज आहे. १४ चौकार आणि ४ षटकारांची त्याची बेधडक खेळी ही स्टार क्रिकेटपटूची लक्षणं आहेत, असं बोललं जातंय.
युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षा कमी वयात (१२ वर्षे २८४ दिवस) त्यानं रणजी करंडकात बिहारकडून पदार्पण केलं. ब्रायन लारा ही माझी प्रेरणा असल्याचं वैभव म्हणतो. ज्या पद्धतीनं ब्रायन लारा प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत आपली खेळी साकारायचा ते मला भावतं, असं तो म्हणतो.
वयावर प्रश्नचिन्ह-
२०२३ मधील एका मुलाखतीमुळं त्याच्या खऱ्या वयाविषयी शंका आहेत. तो १५ वर्षांचा असल्याचं त्यातून सूचित होतं. मात्र, बीसीसीआय आणि बिहार क्रिकेट असोसिएशनच्या रेकॉर्डमध्ये त्याचं जन्मवर्ष २०११ म्हणून नोंदलं गेलं आहे. काहीही असलं तरी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी अशा प्रतिभेची गरज असते.
वैभव सूर्यवंशीनं विनू मांकड करंडक या वयोगटातील स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. तिथं त्यानं एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ७८.६० च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. २०२३ च्या अखेरीस भारत-ब संघाकडून खेळल्या गेलेल्या चतुष्कोणीय मालिकेतील कामगिरीमुळं तो एनसीएच्या वयोगटातील क्रिकेटपटूंसाठीच्या हाय-परफॉर्मन्स शिबिराच्या शर्यतीत आला. तिथं त्याला अधिक शिकण्याची संधी मिळाली.
वेगवान शतकाचा विक्रम कोणाच्या नावावर?…
युवा कसोटीत जलद शतक झळकावण्याचा विक्रम मोईन अलीच्या नावावर आहे. २००५ मध्ये ५६ चेंडूत त्यानं शतक झळकावलं होतं. त्याच्यानंतर वैभवनं स्थान मिळवलं आहे. त्याची हीच कामगिरी कायम राहिल्यास लवकरच तो भारतीय संघात दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.