गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांनी आज गुहागर विधानसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला.
यावेळी बोलताना मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडकर यांनी ही लढाई प्रस्थापितांविरुध्द विस्थापित अशी आहे. गेल्या 60 वर्षात केवळ दोन घराणी गुहागरचे प्रतिनिधीत्व करत आहेत. आता मतदारांनी नव्या चेहेऱ्याला संधी द्यावी. असे आवाहन यावेळी वैभव खेडेकर यांनी मतदारांना केले.
सकाळी शृंगारतळीच्या मनसे कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर व्याडेश्र्वर मंदिरापर्यंत पदयात्रा निघाली. यावेळी उमेदवार गांधी यांच्या समवेत बिग बॉस फ्रेम शिव ठाकरे याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुहागर शहरात आल्यानंतर श्रीदेव व्याडेश्र्वराचे दर्शन घेत प्रमुख कार्यकर्त्यांसह निवडणूक कार्यालयात येवून प्रमोद गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. राज ठाकरे गुहागर आणि दापोलीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार असल्याचे यावेळी वैभव खेडेकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, चिपळूण तालुका सचिव संदेश साळवी आणि मनसैनिक उपस्थित होते.