पुणे आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता पुढील ३ महिने बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय….

Spread the love

भोर : सुरक्षिततेच्या कारणासाठी भोरहून महाडकडे जाणारा वरंध घाट शनिवारपासून (१ जुलै) ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बस व मोठे ट्रक, इतर सहाचाकी वाहनांना बसणार आहे. या काळात फक्त लहान मोटारी व दुचाकी वाहनांना घाटातून प्रवेश देण्यात येईल.

त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून दुरुस्त करण्यात आलेला हा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी अद्याप असुरक्षितच असल्याचे स्पष्ट होत आहे. भोर बाजूनेही हा घाट अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार आहोत, अशी माहिती भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी पडणे, माती वाहून येणे, रस्ता खचणे असे प्रकार झाले होते. गेल्या पावसाळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने कोट्यवधी रुपये खर्चून महाड व भोर तालुक्यांच्या हद्दीत रस्त्याची दुरुस्ती केली.

यंदाही हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी वरंध घाटामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने हा घाट तीन महिने बंद ठेवण्याचा आदेश दिला.

कोकणातून पुण्याकडे जाण्यासाठी महाड, माणगाव, ताम्हिणी घाट, मुळशी, पुणे या मार्गाचा आणि कोल्हापूरकडे जाण्यासाठी पोलादपूर, खेड, चिपळूण, पाटण, कराड, कोल्हापूर या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.

  • एम. एस. आंधळे, सहायक पोलिस निरीक्षक, महाड एमआयडीसी पोलिस ठाणे

निविदा प्रकिया खोळंबली


वरंध घाट हा महाड-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ८२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, अजून या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page