कोकण विभागीय मंडळाच्या प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन… रत्नागिरीत ज्ञानदान चांगले;पहिला नंबर ठेवण्यासाठी सांघिकपणाने काम – पालकमंत्री उदय सामंत..

Spread the love

रत्नागिरी : रत्नागिरीत सर्वात चांगले ज्ञानदान होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कोकण बोर्ड सतत राज्यात पहिले राहिले आहे. ते एक नंबरलाच राहिले पाहिजे, यासाठी सांघिकपणाने काम करु, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
           
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागीय मंडळाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांनी कुदळ मारुन आणि दीपप्रज्ज्वलन करुन आज केले. याप्रसंगी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार तथा राज्य मंडळाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, विभागीय सचिव सुभाष चौगुले, कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एम कासार आदी उपस्थित होते.


           
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, 2012 मधील कोकण बोर्डाची मूहुर्तमेढ रोवण्यात आली आहे. तेव्हापासून मेहनतीने आणि ताकदीने राज्यात पहिल्या 2 क्रमांकात कोकण बोर्ड राहिले आहे. त्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक आणि  शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो. 24 कोटी रुपयांमधून राज्यातील सर्वात देखणी इमारत वर्ष दीडवर्षात उभी राहील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देऊन पालकमंत्री म्हणाले, ज्यांनी ज्यांनी मराठी शिकविली, ज्यांनी ज्यांनी मराठी सुदृढ केली, त्या शिक्षकांना आणि साहित्यिकांना याचे श्रेय जाते. नव्या प्रशासकीय इमारतीमधून दरवर्षी 50 हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे ही इमारत नसून, मंदिर आहे. कोकण बोर्ड नेहमीच महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर राहिले पाहिजे. यासाठी सांघिकपणाने काम करु या, असे ही ते म्हणाले.
           
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, कोकण बोर्डाची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारकीर्दीत कोकण बोर्डाची स्थापना झाली आहे. आमदार विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे या सर्वांचे कोकणावर विशेष लक्ष असते. त्यामुळे आमचे विद्यार्थी बोर्डाला नेहमीच राज्यात अव्वल ठेवतात. त्याबद्दल विद्यार्थी, पालकांचे अभिनंदन करतो. आमदार श्री. म्हात्रे आणि आमदार श्री. काळे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. राज्यमंडळाचे अध्यक्ष श्री. गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक, अधिकारी, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page