रत्नागिरी/प्रतिनिधी- लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रील पासून सहा दिवसीय ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यात येणार आहे अशी माहिती श्री. समीर गुरव यांनी दिली. ते भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्सासरचिटणिस सतेज नलावडे, ठाणे कोकण विभाग समन्वयक अभिजित पेडणेकर, शहरध्यक्ष राजन फाळके , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी, सरचिटणीस मंदार खंडक आदी उपस्थित होते सहा दिवसीय ‘बूथ विजय अभियान’ अंतर्गत प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे श्री. समीर गुरव यांनी सांगितले.
‘बूथ विजय अभियान’ अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या ६ दिवसांत विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत अशी माहिती श्री. समीर गुरव यांनी दिली. घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपा चा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला असे समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील अशी माहिती ही श्री. समीर गुरव यांनी दिली.
भाजपा विरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य, योजना पोहोचवून भाजपाला मत देण्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर रहाणा-या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल.
श्री.समीर गुरव म्हणाले की बूथ समिती व पन्ना प्रमुखांची नियुक्ती तसेच १०० हून अधिक जणांचा व्हॉट्स ॲप ग्रूप बनवण्यात येईल .प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते व पन्ना प्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार असून संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा तसेच मागच्या ३ निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. संमेलनामध्ये बूथ समिती व पन्ना प्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चा ही होतील असे श्री. समीर गुरव यांनी सांगितले.