माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर…

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती…

नवी दिल्ली/03 फेब्रुवारी- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारत देशाची सेवा करण्याचे काम केले. केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक आणि समृद्ध असा अनुभव देणारी ठरली आहेत.

गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण आडवाणी सक्रिय राजकारणातून अलिप्त राहिले होते. जानेवारी महिन्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. राम मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात प्रचंड मोठी चळवळ उभारली. बाबरी मशीदीच्या विवादित जागेवर राम मंदिर व्हावं म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आले होते. सुरुवातीला त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना निमंत्रण नाकारण्यात आलं होतं. यावरून प्रचंड गदारोळ झाला. अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि विहिंपचे आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. परंतु, प्राणप्रतिष्ठा दिनी अयोध्येत तापमान घसरलं होतं. थंडी वाढली होती, त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी तिथे जाणं टाळलं.

२०१५ साली मिळाला होता पद्मविभूषण पुरस्कार

२०१५ मध्ये आडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याच वर्षी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वत: त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांना हा सन्मान दिला होता. त्यावेळी वाजपेयी ९० वर्षांचे होते आणि ते आजारी होते. मुखर्जी यांनी प्रोटोकॉल मोडून माजी पंतप्रधानांना त्यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page