
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील निर्मल व स्मार्ट ग्रामपंचायत हातीवच्यावतीने आयोजित गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमात संगमेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी भरत चौगले यांनी ग्रामपंचातीने पक्षभेद विसरून केलेल्या माजी सरपंच सत्कार कार्यक्रमाचे कौतुक करताना व विकासाची घोडदौड पाहाताना या ग्रामपंचायतीला सर्वोतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले.
गावच्या सहाणेवर आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात स्मार्ट ग्रामपंचात पुरस्कार प्राप्त सरपंच नंदकुमार कदम व त्यांचे सर्व सदस्य जिल्हा परिषदेचा शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ चा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त व मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याने शाळा हातीव नं १ चे मुख्याध्यापक सुनिल करंबेळे व त्यांचे सहकारी शिक्षक यांचा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी कदम ग्रामपंचातीच्या माध्यमातून गावच्या विकासात हातभार लावणारे माजी सरपंच, राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारे शिक्षक विनय होडे, व्हीडीओ मेकिंग स्पर्धेन तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त शिक्षिका प्रज्ञा पवार, महाविदयालय स्तरावर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त प्रगती शिंदे, आर्ट क्षेत्रात बक्षीस प्राप्त प्रथमेश गोंधळी, आकार ऑर्गनायझेशन देवरुखच्या वतीने महिला दिना निमित्त आदर्श आशा म्हणून पुरस्कार प्राप्त माधवी देसाई, उत्तम प्रकारे ग्रामपंचायतीचे काम करणारे ग्रामसेवक शैलेश खरारे, नूतन उपसरपंच इक्बाल साटविलकर यांचा सत्कार तालुक्याचे गटविकास अधिकारी भरत चौगले यांच्याहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सरपंच नंदकुमार कदम यांनी गावातील चांगले काम करणाऱ्या व्यक्तिंच्या पाठिवर शाब्बासकीची थाप मारावी. त्यांना अधिक काम करण्याची प्रेरणा मिळून गावच्या विकासात त्यांची साथ लाभावी म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित केल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक सुनिल करंबेळे यांनी ग्रामपंचायतीच्या या स्तूत्य उपक्रमाबाबत कौतुक करून इतर ग्रामपंचायतीच्या पुढेआदर्श ठेवल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचात सदस्य राजश्री पवार, अहमद साटविलकर, दिक्षिता गावडे, रिया सुतार, लक्ष्मी उंडे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर यशवंतराव, माजी सरपंच रविंद्र कदम, दत्ताराम गावडे, विलास गोंधळी, अंकिता गोंधळी, माजी सरपंचांचे कुटुंब, सदस्य, पोलीस पाटील जान्हवी गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत शिवगण, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी ताई, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास ग्रामसेवक खरारेंच्या मार्गदर्शनाखाली जयेश घोगले, बंड्या कोटकर व चैतन्या कदम यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक विनय होडे व कुमारी प्रगती शिंदे हिने केले. आभार व्यक्त करताना उपसरपंच इक्बाल साटविलकर यांनी उत्तम सहकार्याबद्दल गटविकास अधिकारी भरत चौगले, माजी सरपंच यांना विशेष धन्यवाद देऊन गावच्या विकासात राजकारण न करता सहकार्य करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.