मुंबई- पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात मला तिसऱ्यांदा स्थन मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. तसेच मोदी मला जे खाते सोपवतील त्याची जबाबदारी मी निभावेल असेही आठवले म्हणाले. मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून रामदास आठवले यांचे नावही समोर आले आहे.
भारत विकासाच्या दिशेने अत्यंत पुढे जातोय…
आज रामदास आठवले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ”माननीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. भारताचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. भारत विकासाच्या दिशेने अत्यंत पुढे जात आहे. लोकसभा निवडणुकीत काही जागा कमी आल्या असल्या तरी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित होते. त्यांच्या या मंत्रिमंडळात मला तिसऱ्यांदा स्थान मिळत आहे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे”, असे आठवले म्हणाले.
मोदी मला जे खातं देतील ते मी निभावेल…
तसेच रामदास आठवले म्हणाले, ”मी दलित समाजातून आलो आहे. देशभरातील दलित, गरीब आणि सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी मी काम करत राहणार आहे. मोदींनी मला ही जबाबदारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो”, असे आठवले म्हणाले. शिवाय त्यांना कोणते खाते मिळणार असे विचारण्यात आले. यावर बोलतांना ते म्हणाले, ”सध्या एनडीएमध्ये अनेक मित्रपक्षांचा समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मला जे खातं देतील ते मी निभावेल” असे आठवले म्हणाले.
महाराष्ट्रातून 5 जणांची चर्चा..
दरम्यान, महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी भाजप नेत्या रक्षा खडसे, नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी एनडीएमधल्या घटकपक्षांमुळे भाजप पुन्हा सत्तेवर बसणार आहे. या सोहळ्याची दिल्लीमध्ये जय्यत तयारी सुरू आहे.