रत्नागिरी, दि. 12 (जिमाका) : भरारी पथक, एसएसटी पथक यांनी दक्ष रहावे. वाहन तपासणीदरम्यान विशेषत: महिलांविषयी आदरभाव ठेवावा. उमेदवारांच्या खर्चाबाबत काटेकोर रहा, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांनी दिल्या.
येथील अल्प बचत सभागृहात निवडणूक खर्च आढावा बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, शिवप्रसाद खोत, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेंडगे आदी उपस्थित होत्या.
श्री. सुर्वे यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर आढावा दिला. यानंतर निवडणूक खर्च निरीक्षक श्री. गोयल म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्वांनी काटेकोरपणे काम करावे. प्रत्येक बाबतीत दक्ष रहावे. विशेषत: मद्य वाहतुकीबाबत अत्यंत सतर्क रहा. वाहन तपासणी दरम्यान आदरभाव ठेवावा. विशेषत: कुटुंब, महिला याबाबत आदरपूर्वक कार्यवाही करावी. महिला अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. एमसीएमसी समितींनेही पेड न्यूज, अन्य जाहिरातींबाबत सतर्क राहून कामकाज करावे. सर्वच पथकांनी समन्वयाने खर्च नियंत्रणाचे काम काटेकोरपणे करावे.