
पदवीधर मतदासंघासाठी येत्या ३० जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवाराचा प्रचार न करता. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याने अहमदनगर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुरेश सांळुखे यांना देखील पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
याबद्दल माहिती देताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, ‘नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मविआच्या उमेदवाराला पाठिंबा न देता अहमदनगर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या होत्या.’
यानंतर जिल्हाध्यक्षांना १७ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवून दोन दिवसात खुलासा करण्यास सांगितले होते परंतु ७ दिवसानंतरही त्यांनी खुलासा केला नाही त्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे यांना २४ जानेवारी रोजीच निलंबित करण्यात आले असून अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात आली आहे.
याअगोदर कॉंग्रेस पक्षाने नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल न केल्याने पक्षाचा आदेश न पाळल्याने पक्षातून निलंबित केलं होतं. पक्षानं अधिकृत उमेदवारी जाहीर करून व एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली व मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. तांबे यांच्या या भूमिकेमुळं काँग्रेस पक्षात संताप असल्याचं दिसून येतंय. डॉ. सुधीर तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबीत करण्यात आलं. त्यानंतर आता सत्यजित तांबे यांच्यावरही पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.
पदवीधर मतदासंघासाठी येत्या ३० जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी गेम पलटी केल्याचं दिसून आलं. पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारत त्यांनी आपल्या मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.