मुंबई- आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे एकमेव आमदार यांनी मुख्यमंत्री यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावरच बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी देखील दुजोरा दिला आहे. 10 तारखेला धारणी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजकुमार पटेल शिवसेना पक्षप्रवेश करणार आहेत.
प्रहार पक्षाचे एकमेव असलेले आमदार राजमूकर पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. राजकुमार पटेल यांच्या पक्षप्रवेशानंतर आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा देखील दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला जो घाव दिला आहे त्याच्या मोबदल्यात हजारो घाव आम्ही शिंदेंना देऊ, असा थेट इशाराच देण्यात आला आहे.
आमदार बच्चू कडू काय म्हणाले?…
राजकुमार पटेल यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, प्रत्येकाचा एक वैयक्तिक स्वार्थ असतो. त्यामुळे ते गेले असतील. त्याची आम्हाला काही पर्वा नाही. त्यांनी जिथे असतील तिथे सुखी राहावे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी आम्हाला जो घाव दिला आहे त्याच्या मोबदल्यात आम्ही त्यांना हजारो घाव देऊ, शिंदे गटाला देखील आम्ही प्रत्युत्तर देऊ. त्यांनी एक खेळी खेळली तर आम्ही दहा खेळी खेळू. त्याचे परिणाम शिंदेंना भोगावे लागतील, असा इशारा बच्चू कडू यांनी शिंदेंना दिला आहे. तसेच राजकुमार यांच्यासोबत मैत्री कायम ठेवत तिथे उमेदवार उभा करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
शिवसेना पक्षप्रवेशावर काय म्हणाले राजकुमार पटेल?..
कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजकुमार पटेल म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठल्याच विकास कामांसाठी नाही हा शब्द वापरला नाही. विकासासाठी जेवढा निधी एकनाथ शिंदेंनी दिला तेवढा निधी कोणीच दिला नाही. मी मंत्री उदय सामंत यांना शिवसेनेमधून धनुष्यबाण या चिन्हवर निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आपल्या सर्वांची तयारी असेल तर येत्या 10 तारखेला प्रवेशासाठी सर्वांनी तयार रहा, असे राजकुमार पटेल म्हणाले.
पुढे बोलताना राजकुमार पटेल म्हणाले, लोक म्हणतील राजकुमार पार्टी बदलण्यात माहीर आहे. पण विकासासाठी जावं लागतं. पक्ष नाही बदलला तर माझा पगार मला मिळतोच. आधी 60 होता तो आता 70 झाला. सरकारने दोन वर्षे निवडणूकसाठी वाढवले पाहिजे कारण दोन वर्षे आमचे कोरोनात वाया गेले, असेही ते यावेळी म्हणाले. 10 तारखेला मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.