नवी दिल्ली :- डिजिटल क्रांतीमुळे ऑनलाइन व्यवहार वेगानं वाढत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे लोकांसाठी पेमेंट करणे किंवा खरेदी करण्यासारखी कामं अतिशय सोपी झाली आहेत. परंतु, अशी फसवणूक करणारे लोक लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. आजकाल फसवणूक करणारे बनावट केवायसी अपडेट मेसेज पाठवून ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. MyGov या सरकारच्या सिटिझन एंगेजमेंट मंचानं याबाबत अलर्ट जारी केला आहे.
केवायसी अपडेट करण्यासाठी फसवणूक करणारे अनेकदा बँक ग्राहक, आधार आणि पॅन कार्डधारकांना बनावट मेसेज पाठवतात. आजकाल नागरिकांना एसएमएस आणि ईमेलद्वारे असेच संदेश मिळत आहेत. ग्राहकांनी या मेसेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आणि OTP शेअर करताच त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात.
अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी MyGov ने नागरिकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. बनावट केवायसी अपडेटपासून सावध रहा! केवायसी अपडेट करण्यासाठी तुमचा ओटीपी कोणाशीही शेअर करू नका. सायबर सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करा, असं त्या मेसेजमध्ये म्हटलंय.
कसं वाचाल?
कोणत्याही अनोळखी मोबाइल नंबरवरून कॉल, मेसेज किंवा ईमेलला प्रतिसाद देऊ नका.
जर तुम्हाला असे कॉल किंवा मेसेज वारंवार येत असतील तर तुमचे बँक खाते त्वरित सुरक्षित करा.
तुमच्या स्मार्टफोन डिव्हाइसच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी मालवेअर तपासत राहा.
नेहमी व्हेरिफाईड सोर्सकडूनच मोबाइल अॅप्स डाऊनलोड करा.
अँटीव्हायरस डाउनलोड करा आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये ठेवा.
फसवणूक झाल्यास काय कराल?
तुमच्या बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून माहिती द्या.
बँकेच्या मोबाइल अॅपवरून पैशांचे व्यवहार, कार्ड व्यवहारांची सुविधा त्वरित ब्लॉक करा.
फिशिंग कॉल, मेसेज, ईमेल किंवा संशयित व्यक्तीच्या बाबतीत सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करा.
सायबर सेलच्या cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तक्रार नोंदवा.
सायबर सेलच्या ट्विटर अकाउंट https://twitter.com/Cyberdost वर तक्रार करा.