
जनशक्तीचा दबाव न्यूज | भांबेड | ऑक्टोबर २०, २०२३.
गुरूवार दि. १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ०४:३० वा. स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातून तर राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. अजितदादा पवार तसेच कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी सह्याद्री अतिथीगृहातून उपस्थिती लावली. ५११ कौशल्य विकास केंद्रांवरून जवळपास ५.५ लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, संस्था पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांत कार्य सामाजिक करणाऱ्या व्यक्तींनी सभागृहामध्ये एकत्रितपणे हा उद्घाटन सोहळा पाहीला.
भांबेड येथील माध्यमिक महाविद्यालयात भाजपा नेत्या सौ. राजश्रीताई (उल्का) विश्वासराव यांच्या नेतृत्त्वाखाली परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आपला ऑनलाईन सहभाग नोंदवला. केंद्र सरकारच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने महाराष्ट्रात ५११ स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आली असून त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की “रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये, या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची ही संकल्पना राबवण्यात येत असून भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.” आज राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ५११ केंद्रे सुरू करण्यात आली. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ११ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. भविष्यात आवश्यकतेनुसार या केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येईल.
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा त्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा विकास व्हावा हा यामागील उद्देश आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सौ. उल्का विश्वासराव यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस श्री. अमित केतकर, लांजा भाजपा तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, श्री. श्रीकांत ठाकूरदेसाई, श्री. सुरेशशेठ गांधी, श्री. संतोष चव्हाण सर, श्रीम. परिणीता सावंत, श्री. कमलाकर शिवगण, श्री. प्रथमेश बेंडल, श्री. अविनाश कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, ३०० विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.