अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडा गोल्फ क्लब इथं हा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडा गोल्फ क्लब इथं हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. याबाबत एफबीआयनं गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला केल्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोणतीही राजकीय हिंसा खपवून घेणार नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेची उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा हल्ल्याचा प्रयत्न…
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडा गोल्फ क्लब इथं अज्ञात हल्लेखोरानं त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी या संशयितावर गोळीबार केला. त्यामुळे हा संशयित त्याच्याकडचं शस्र सोडून पळून जात असताना त्याला पकडण्यात आलं. या घटनेनं जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एफबीआयनं गुन्हा दाखल करुन एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. एफबीआयकडून पुढील तपास सुरू आहे, असं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्पवर पेन्सिलवेनियामध्ये झाला होता गोळीबार…
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील पेन्सिलवेनिया इथल्या कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला होता. एका रॅलीला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी एक गोळी त्यांच्या कानशिलाला चाटून गेली. त्यामुळे डोनाल्ड ट्रमप तोडक्यात बचावले होते. रॅली सुरू असलेल्या ठिकाणी बाजुच्या ठिकाणावरुन डोनाल्ड ट्रम्प यांना टार्गेट करण्यात आलं होतं.