ठाणे : निलेश घाग कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रभाग स्तरावरील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रभागातील साहाय्यक आयुक्तांंवर शासन निर्णयाप्रमाणे सोपवली आहे. बेकायदा बांधकाम विषयीचे शासन आदेश, न्यायालयीन संपर्क या कामासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी आणि नागरिकांना घर बसल्या तक्रारी करता याव्या म्हणून आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून १८००२३३४३९२ हा सुविधा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांंनी ठाणे पालिका हद्दीतील बेकायदा इमारती तोडण्यासाठी विशेष कार्यक्रम घोषित केल्यानंतर कल्याण डोंबिवली पालिकेनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतल्याने बांधकाम व्यवसायमध्ये खळबळ उडाली आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मागील २५ वर्षाच्या कालावधीत एक लाख ६७ हजार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. याशिवाय मागील तीन वर्षाच्या काळात टोलेजंग ६५ बेकायदा इमारती उभारून भूमाफियांनी या इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या बेकायदा इमारतीमधील सदनिका नागरिकांना विकल्या आहेत. या बेकायदा बांधकाम प्रकरणी हरिश्चंद्र म्हात्रे, वास्तुविशारद संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.