आसामच्या रियान परागच्या दमदार खेळीनं राजस्थानचा सलग दुसरा विजय; विजयापासून ‘दिल्ली’ दुरच…

Spread the love

आसामच्या रियान परागच्या दमदार खेळीनं राजस्थानचा सलग दुसरा विजय; विजयापासून ‘दिल्ली’ दुरच
IPL 2024 RR vs DC : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपीटल्सचा 12 धावांनी पराभव करत विजय मिळवला. यासह त्यांनी या हंगामातील सलग दुसरा सामना जिंकलाय. तर दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव झालाय.

जयपूर : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थाननं दिल्लीचा 12 धावांनी पराभव करत विजय मिळवला. यासह त्यांनी या हंगामातील सलग दुसरा सामना जिंकलाय.

दिल्लीच्या फलंदाजांची निराशजनक कामगिरी…

राजस्थाननं दिलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. त्याचा परिणाम म्हणून त्यांना सामना गमवावा लागला. दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित 20 षटकांत 5 विकेट्स गमावून केवळ 173 धावा करता आल्या. संघाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक 49 आणि ट्रिस्टन स्टब्सनं नाबाद 44 धावा केल्या. तर कर्णधार ऋषभ पंतला केवळ 28 धावा करता आल्या. उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. राजस्थानकडून नन्द्रे बर्गर आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर आवेश खानला एक विकेट मिळाली. या हंगामात दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव आहे. दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून (PBKS) 4 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता.

परागची दमदार खेळी…

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघानं केवळ 36 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जैस्वाल (5), कर्णधार संजू सॅमसन (15) आणि जॉस बटलर (11) हे स्वतात बाद झाले. मात्र त्यानंतर रियान पराग आणि आर अश्विन (29) यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी 37 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. परागनं 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. अश्विन बाद झाल्यानंतर परागनं ध्रुव जुरेल (20) सोबत 23 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. शेवटी परागनं 45 चेंडूत नाबाद 84 धावांची सर्वोच्च खेळी केली. परागसह शिमरॉन हेटमायरनं 16 चेंडूत 43 धावा जोडल्या. अशा प्रकारे राजस्थानची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 185 धावांपर्यंत पोहोचली. दिल्ली संघाकडून खलील अहमद, कुलदीप यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्सिया आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

ऋषभ पंतचा अनोखा विक्रम…

ऋषभ पंतचा दिल्ली संघासाठी हा 100 वा सामना होता. अशी कामगिरी करणारा तो दिल्ली कॅपिटल्सचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी फक्त अमित मिश्रानं दिल्लीसाठी सर्वाधिक 99 सामने खेळले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page