
चिपळूण : आषाढी एकादशीच्या निमित्ताने चिपळूण शहरातील श्री दत्त मंदिर, खेर्डी येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ‘होऊ विठुरायाच्या भजनात दंग’ या संकल्पनेतून भक्तिपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. त्यानंतर जवळपास वीस भजन-अभंग महिला गायकांच्या सादरीकरणातून सादर करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामस्मरणाच्या जल्लोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. जिजाऊंच्या लेकींनी आपल्या सुरेल गायनातून वातावरण भक्तिपूर्ण आणि चैतन्यमय केले.
या कार्यक्रमासाठी श्री दत्त मंदिराचे कदम काका व कदम काकू यांचे विशेष सहकार्य लाभले, तसेच त्यांचे नातू कु. पार्थ जाधव यानेही कार्यक्रमाच्या यशस्वितेत मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाला शिवमती मालतीताई पवार (माजी कोकण उपविभागीय अध्यक्ष), निर्मलाताई जाधव (माजी कोकण मुंबई विभागीय कार्याध्यक्ष), सामाजिक कार्यकर्त्या व जिजाऊ ब्रिगेड सदस्या सीमाताई चाळके (माजी चिपळूण उपतालुकाध्यक्ष), प्राजक्ताताई सरफरे (माजी शहर खजिनदार), माधवी भागवत (तालुका अध्यक्ष), मिलनताई गुरव (उप तालुकाध्यक्ष), वीणाताई जावकर (चिपळूण शहर अध्यक्ष), वर्षा खटके पाटील (उप शहर अध्यक्ष), स्मिताताई खंडारे (शहर सचिव), संध्याताई घाडगे, अनामिकाताई हरदारे, देवयानी हरदारे, अलकाताई कदम, सुप्रियाताई कवितके आणि श्रद्धाताई कदम या सर्व जिजाऊंच्या लेकी उपस्थित होत्या.
या भक्तिपर्वाला लाभलेला उत्साही प्रतिसाद आणि महिलांचा सक्रीय सहभाग हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले.
चिपळूण जिजाऊ ब्रिगेडतर्फे सर्व सहकार्यकर्त्यांचे आणि सहभागींचे विशेष आभार शहराध्यक्ष शिवमती वर्षा खटके पाटील यांनी मानले.