तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या:7 मे रोजी राज्यातील 11 मतदारसंघात मतदान; जाणून घ्या, कोणत्या आहेत जागा अन् कशी होणार लढत…

Spread the love

मुंबई- तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, माढा, धाराशिव (उस्मानाबाद), रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली, सातारा व सोलापूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक मतदारसंघात जोरदार प्रचार सभा पडल्या. बारामती लोकसभा मतदारसंघात आज तर सांगता सभेचा थरार पाहायला मिळाला. एकीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वातील सभा व दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वातील सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थातील सभा चांगलीच गाजली. एकमेकांवर जोरदार निशाणा साधल्याने रविवार जणू पवार प्रचार संडेच वाटू लागला होता.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माढा लोकसभा मतदारसंघात जोरदार सभा पार पडली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. बारामतीसह राज्यातील सर्वच ठिकाणी पवार विरुद्ध पवार असा लढा नाही तर मोदी विरुद्ध राहुल गांधी असा लढा आहे. त्यामुळे मतदारांनी उज्वल भवितव्यासाठी महायुतीला पसंदी द्यावी, अशी साद त्यांनी घातली.

चला जाणून घेऊया, मंगळवारी कुठे होणार मतदान, कशी असणार लढत…!..

🔹️बारामती : राज्य, देशासह जगाचेही लक्ष…

बारामती मतदारसंघाकडे राज्य, देशाचे आणि जगाचेही लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर वयाच्या 84 व्या वर्षात असलेले शरद पवार ज्या तडफेने उभे राहिले, ते थक्क करणारे आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार अशी नणंद- भावजयीची लढत होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादांच्या सख्ख्या भावासह संपूर्ण पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या मागे एकवटले आहेत.

🔹️धाराशिव : पारंपरिक विरोधक आमनेसामने…

उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातही हाय होल्टेज लढत होत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. अर्चना पाटील या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत. पाटील आणि राजेनिंबाळकर कुटुंबीय पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. खासदार राजेनिंबाळकर हे गेल्या पाच वर्षांत जनतेशी ठेवलेल्या संपर्कावर, त्यांची कामे केल्याच्या जोरावर मते मागत आहे.

🔹️माढा : पवारांच्या डावाने भाजप हतबल…

या टप्प्यातील माढा हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला तो अकलूजच्या मातब्बर मोहिते पाटील घराण्यामुळे. माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी हवी होती, मात्र भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. खासदार निंबाळकर यांनी मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधकांची जुळवाजुळव सुरू केली होती. त्यामुळे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून भाजपला अनपेक्षित असा जबर धक्का दिला. त्यांच्यापाठोपाठ अजितदादा पवार गटाचे उत्तम जानकर यांनीही ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अजितदादा पवार यांच्यासह भाजपला आणखी एक धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होत आहे.

🔹️सोलापूर : दोन यंग उमेदवार उतरले मैदानात…

सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीतील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत आहे. गेल्या सलग दोन टर्मचे खासदार भाजपचे होते आणि ते निष्क्रिय होते, हे भाजपसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे सातपुते यांनी ही निवडणूक हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न केला. राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत. त्यांच्या विजयात विजयसिंह मोहिते पाटील यांचा मोलाचा वाटा होता. आता मोहिते पाटील यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचा सोलापूर मतदारसंघावर काय परिणाम होईल, हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

🔹️लातूर : देशमुख सक्रिय, बालेकिल्ला येईल का?…

अमित देशमुख आणि त्यांचे काका माजीमंत्री दिलीपराव देशमुख हे सक्रिय झाल्याने लातूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. लातूरमधून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देणे, हा देशमुखांचा मास्टरस्ट्रोक समजला जात आहे. त्यांची लढत भाजपचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्याशी आहे. काळगे यांच्या विजयासाठी देशमुख काका – पुतणे अंग झटकून कामाला लागले आहेत. यावरून देशमुखांनी एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर लोकसभा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी चंग बांधलल्याचे दिसत आहे.

🔹️कोल्हापूर : छत्रपतींचे घराणे विरुद्ध महायुती…

राज्याचे लक्ष लागलेल्या मतदारसंघांमध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करून महायुतीची कोंडी केली होती. ती कोंडी फोडण्यासाठी महायुतीने खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली. संजय मंडलिक यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सभी घेतली. शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. शाहू महाराज छत्रपती यांचे सर्वसमावेशक विचार आणि विभाजनवादी विचार अशी ही लढाई आहे. त्यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

🔹️सांगली : तीन पाटलांमध्ये चुरशीची लढत?…

जागा शिवसेनेला सुटल्यामुळे काँग्रसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे सांगली मतदारसंघात राज्यभरात चर्चेत आला आहे. भाजपने खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मैदानाच उतरवले आहे. सांगलीतील काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असे सांगितले जाते. त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. तिरंगी लढतीत शिवसेनेचे चंद्रहार पाटील मैदान मारतील का, हे पाहावे लागणार आहे.

🔹️साताराः उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे..

साताऱ्यात महायुतीतील भाजपचे उमेदवार, छत्रपती शिवरायांचे वारस उदयनराजे भेसले आणि महाविकास आघाडीतील शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे. येथून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांना दिल्लीत जाऊन दोन-तीन दिवस प्रतीक्षा करावी लागली होती. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली.

🔹️रायगड : ठाकरे गट की अजित गट बाजी मारणार?…

रायगड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अनंत गिते यांच्याविरुद्ध महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे अशी लढत होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्षच उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघात अजितदादा पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कुठल्याही लाटेला न जुमानणारा मतदारसंघ, असे रायगडबाबत बोलले जाते.

इंदिरा गांधीच्या हत्येनंतर देशमभरात काँग्रेसची लाट होती, मात्र रायगड लोकभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता. 2014 च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी अनंत गिते विजयी झाले होते. 2019 मध्ये सुनील तटकरे यांनी अनंत गितेंचा पराभव केला होता. त्यावेळीही काही प्रमाणात मोदी लाट होती. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🔹️हातकणंगले : शेट्टी, ठाकरे अन् शिंदे गटात तिरंगी लढत…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी रिंगणात असल्यामुळे हातकणंकले लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या विरोधात महायुतीचे खासदार धैर्यशील माने (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीचे म्हणजेच ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आहेत. शेट्टी हे महाविकास आघाडीकडून लढतील, असे चित्र सुरवातीला निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे त्यासाठी तयार झाले होते, मात्र शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याची अट त्यांनी ठेवली होती. शेट्टी यांना ती मान्य नसल्याने बोलणी फिसकटली. त्यामुळे महाविकास आघाडीने सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाकडून खासदार माने यांचे तिकीट कापले जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. उमेदवारी मिळवण्यात माने यशस्वी झाले. या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे.

🔹️रत्नागिरी-सिंधुदुर्ग : राणे-ठाकरे यांच्या प्रतिष्ठेची लढाई…

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतील विनायक राऊत यांचे आव्हान आहे. महायुतीचा उमेदवार कोण, याचा सस्पेन्स लवकर संपला नाही, कारण उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. हा पेच बरेच दिवस सुटला नव्हता. अखेर हा मतदारसंघ भाजपला सुटला आणि नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी अनेकदा पातळी सोडल्याचे राज्याने पाहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर या लढतीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page