*पुणे-* राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. दरम्यान,नेत्यांचे पक्षांत्तर सुरू आहेत. आज भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा आज इंदापूरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
इंदापूर येथे आज हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार) प्रवेश झाला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहिते, शरद पवार गटाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांच्यासह पक्षातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांना पक्षात सहभागी करून घेतलं. यावेळी हर्षवर्धन पाटलांनी जयंत पाटलांचे आभार मानले. पाटील म्हणाले, जयंतराव आपण १५ वर्षे एकत्र काम केलं आहे. आज तुम्ही या पक्षाचे अध्यक्ष आहात आणि मला तुम्ही या पक्षात सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांना अदृश्य मदत केल्याचे पाटील म्हणाले. या विधानानंतर सभेत एकच जल्लोष सुरू झाला. खासदार सुप्रियाताई आमच्या भगिनी आहेत, ताई तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही चारवेळा खासदार झाला. तीनवेळा आमचा प्रत्यक्ष थोडाफार सहभाग होता. आणि कालच्या लोकसभा निवडणुकीत आमचा अदृश्य सहभाग होता, असं विधान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. पाटील हर्षवर्धन म्हणाले, साहेब तुम्ही आग्रह केला, ताई आपलंही बोलणं झालं. जयंतराव तर ज्यावेळी भेटायचे किंवा फोन व्हायचा तेव्हा का थांबलाय तिकडे या इकडे म्हणायचे. पण शेवटी कुठल्याही गोष्टीला योग लागतो. माझी कामाची पद्धत अशी आहे की व्यक्तिगत मी कधी निर्णय घेत नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि म्हणाले आता आपल्याला राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे. तुम्हीही आम्हाला सन्मानाने प्रवेश दिला, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.