रांजणपाडा रेल्वे भरती लढा जिंकला, आता ‘आयओटी’वर धाड
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )
शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसून सरपंचांमार्फत परस्पर नोकर भरती केल्याप्रकरणी धुतूम शेमटीखारच्या ग्रामस्थांनी एकजुटीने बेमुदत उपोषण सुरु केले होते. पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आंदोलनाला पाठिंबा देवून रेल्वे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा करून हा तिढा सोडविला. त्यामुळे ठेकेदारांनी रेल्वे अधिकार्यांच्या साक्षीने नोकर भरती स्थानिकांमार्फत करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने आंदोलन स्थगित करण्यात आले.
रेल्वेच्या रांजणपाडा रेल्वे स्टेशनवरील प्रायोगिक तत्वाच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीने सात कामगारांची वर्णी लावण्यात आली. त्यामध्ये शेतकरी आणि काही सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी सदस्यांच्या मर्जीतील कामगारांचा समावेश झाल्याने शेतकर्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि आंदोलनाची ठिणगी पडली.आज दुसर्या दिवशी तीन आंदोलकर्त्यांची प्रकृती ढासळली आणि उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकू लागला. तातडीने सरकारी वैद्यकीय अधिकारी आले आणि त्यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर उपोषण सुरु ठेवले.
दुसरीकडे ठरल्याप्रमाणे आज सकाळी रेल्वे अधिकारी शुभांगी मॅडम, दक्षता विभागाचे सोनावणे यांनी रेल्वेच्या दालनात सरपंच, ग्रामपंचायत कमिटी आणि आंदोलकांच्या प्रतिनिधीसोबत बंद दरवाजाआड चर्चा केली.त्या बैठकीत आंदोलकांच्या तिन्ही मागण्या मान्य केल्या. आंदोलक आंदोलनास्थळी आले. पुढे लेखी आश्वासन मागितल्यानंतर बैठकीतील चर्चेला छेद देत रेल्वे अधिकार्यांनी दिलेला शब्द फिरविला. शिवाय सरपंचांना आंदोलनाच्या मागण्या मान्य नसल्याने आपण काहीही करू शकत नाही, असे म्हणत रेल्वे अधिकार्यांनी सपशेल हात वर करून आंदोलकर्त्यांची थट्टा मांडली.
टोपी फिरवण्याच्या वृत्तीवर सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी कायद्याचा आधार घेत रेल्वे प्रशासनाला चांगलाच धडा शिकविला. आंदोलनाची दखल न घेणार्या तहसीलदार उद्धव कदम यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा इशाराही कांतीलाल कडू यांनी यावेळी दिला. सरपंच पद हे मालकी तत्व नसून लोकसेवक असल्याची आठवण करून देत रेल्वे प्रशासनावर कडू यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने दोन तासांच्या कायदेशीर संघर्षानंतर रेल्वे प्रशासन आणि ठेकेदारांनी नांगी टाकली आणि सरपंचांची मुजोरी झुगारून शेमटीखार आंदोलकांना नोकर भरतीचे लेखी आश्वासन दिले. यानंतर उपोषणकर्त्यांनी विजयाचा कल्ला केला.
सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना विशेष धन्यवाद देताना रणजित ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आणि शेमटीखार संघटनेचे अध्यक्ष विनोद ठाकूर यांनी ‘आयओटी’च्या भ्रष्ट कारभाराविरोधात लढा देण्याची घोषणा केली.
चर्चेत आंदोलनकर्त्यांसह जिपच्या माजी सदस्या कुंदा ठाकूर, शरद ठाकूर, नितीन मढवी, संघर्ष समितीचे सचिन पाटील, वैभव जोशी, हरेश पाटील तर रेल्वेच्या शुभांगी मॅडम यांच्या समवेत दक्षता विभागाचे सोनावणे, ठेकेदार महेश म्हात्रे, उरण पोलिस ठाण्याचे पोलिस पथक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि पथक उपस्थित होते.आंदोलनकर्त्यांमध्ये विनोद ठाकूर, रेश्मा ठाकूर, रणजीत ठाकूर, विनोद घरत, सुंदर ठाकूर, रोशन ठाकूर, राम पाटील, मेघनाथ ठाकूर, किशोर पाटील, प्रमोद पाटील, निलेश पाटील, लीलाधर घरत, मनोहर ठाकूर, अनंत ठाकूर, गणेश पाटील, मेघनाथ ठाकूर, जयेश घरत आदींचा समावेश होता.
सिडको अधिकारी येणार अडचणीत
रांजणपाडा रेल्वे स्टेशनशी सिडकोचा दुरान्वये संबंध नसल्याची हाकाटी पिटत आंदोलनकर्त्यांना टाळणारे सिडको अधिकारी रेल्वे अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनंतर तोंडावर आपटले आहेत.सिडकोचे रेल्वे विभागातील अधीक्षक अभियंता सिताराम रोकडे यांनी सिडकोचा रांजणपाडा स्टेशनची संबंध नसल्याची ग्वाही सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्याशी बोलताना दिली होती. याविषयी शुभांगी मॅडम यांना छेडले असता, सिडकोने जमीन संपादन करून रेल्वेला हस्तांतरित केली आहे. शिवाय लेखी करार केला असून त्यांना जबाबदारी झटकता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे यापुढे याविषयी सिडको अधिकार्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाईल, असे कडू यांनी सांगितले.