*रत्नागिरी, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील कामगिरीची पडताळणी करण्याकरिता उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, विभागीय क्रीडा संकुल, शुटींग रेंज खोली क्र.१, रेसकोर्स नाका, संभाजीनगर, कोल्हापूर यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.*
राज्य शासनाच्या विविध विभागामधील तसेच राज्य शासनाच्या मालकीच्या तसेच नियंत्रणाखालील विविध महामंडळात तसेच स्थानिक प्राधिकरणांत अत्युच्च गुणवत्ताप्राप्त खेळाडूंना ५ टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी पात्र खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी विभागीय उपसंचालक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या रेल्वे विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी गुणवत्ताधारक खेळाडूंची भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. भरतीमध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी व प्राविण्य मिळविलेले खेळाडू पात्र असणार आहेत. खेळाडू भरतीसाठी क्रीडा विभागास राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील कामगिरीची पडताळणी करणे आवश्यक असून, ही पडताळणी करण्याची कार्यवाही यापूर्वी संचालनालय स्तरावरून करण्य़ात येत होती. तथापि, राज्यातील खेळाडूंना संचालनालय स्तरावरून विहित नमुन्यामधील प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने, यापुढे अर्जदार खेळाडूंची कामगिरी त्या त्या विभागातील विभागीय उपसंचालक स्तरावरून प्रमाणित करून देण्यात येत आहे.