आदित्य एल-१ ने पार केली चौथी कक्षा
१५ सप्टेंबर/श्रीहरिकोटा : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात भ्रमण करणाऱ्या आदित्य एल-१ चे पृथ्वीभोवतीचे चौथे ऑर्बिट मॅन्यूव्हर शुक्रवारी पहाटे यशस्वीपणे पार झाले.
आता हे अंतराळ यान २५६ किमी x १२१९७३ किमीच्या कक्षेत पोहोचले असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने दिली आहे.
मॉरिशस, बंगळूर, SDSC- SHAR आणि पोर्ट ब्लेअर येथील इस्रोच्या ग्राउंड स्टेशन्सनी या ऑपरेशन दरम्यान उपग्रहाचा मागोवा घेतला. तर आदित्य-L1 साठी फिजी बेटांवर तैनात असलेले ट्रान्सपोर्टेबल टर्मिनल पोस्ट-बर्न ऑपरेशनसाठी सपोर्ट देईल. आदित्य एल-१ चे पुढील मॅन्यूव्हर १९ सप्टेंबर रोजी सुमारे २ वाजता पार पडणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे.
याआधी आदित्य एल-१ ने ३, ५ आणि १० सप्टेंबर रोजी पृथ्वीभोवतीची अनुक्रमे पहिली, दुसरी आणि तिसरी कक्षा यशस्वीरित्या पार केली आहे. सुमारे चार महिने हा उपग्रह अंतराळात प्रवास करत राहणार आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये असणार्या एका लॅग्रेंज पॉईंटवर तो ठेवण्यात येईल. हा पॉईंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर आहे. हे अंतर चंद्राच्या तुलनेत चार पटींनी अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी ‘आदित्य एल-१’ला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल, असा ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.