
प्रतिनिधी – विनोद चव्हाण – देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होत असताना राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने ग्रामसभेत पहिले जल अंदाजपत्रक सादर करून इतिहास रचला आहे.
पाणी ही सर्वात मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून, त्याचे व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे. याच विचारातून ग्रामपंचायतीने गावातील पाण्याचा संपूर्ण लेखाजोखा ग्रामसेविका सोनाली हिवाळे यांनी जल अंदाजपत्रक तयार करून त्याची मांडणी ग्रामसभेत करण्यात आली. या वर्षीच्या पावसाळ्यात किती मिलीमिटर पाऊस पडला त्यातील किती पाणी कसे व कुठे गेले आणि त्यातील शिल्लक पाण्यातून मानवाची गरज, पशू पक्षांची गरज, शेतीसाठीची गरज तसेच उद्योग धंद्यासाठी पाण्याची गरज एवढी गरज भागवून शिल्लक राहणारे पाणी आणि या शिल्लक पाण्याचा पुढील वापर व साठा याबाबत अतिशय सखोल असे जल अंदाज पत्रक सादर करण्यात आले. तसेच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत अडवण्यासाठी शेतात जलतारा बांधणे, सांडपाण्यासाठी शोषखड्डे बांधणे या बाबींवर काम करण्यासाठी आवाहन करण्यात आले. पाण्याचा लेखा जोखा तयार करुन असे जल अंदाजपत्रक ग्रामसभेत मांडणारी कळसवली ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
सरपंच देवेश तळेकर आणि ग्रामसेविका सोनाली हिवाळे यांच्या ग्रामसभेत गावाच्या पाण्याच्या साठ्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. पाणी बचतीसाठी पावसाचे पाणी अडवण्यासाठी शेतात जलतारा बंधारे बांधणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी शोषखड्डे तयार करणे, पाण्याचा सुयोग्य वापर करून टाकाऊ जलसंवर्धनाचे उपाय राबवणे. वैयक्तिक स्तरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग बांधणे सीसीटी बांधणे यासारख्या बाबींवर काम करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामपंचायत कळसवली ने माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत सहभाग घेतलेला असल्याने विविध ठराव मंजूर करणेत आले. गावात होत असलेल्या नाविन्यपूर्ण कामाबद्दल ग्रामस्त समाधान व्यक्त करीत आहेत.