महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रस्ता सुरक्षा महिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन…
रत्नागिरी प्रतिनिधी:-अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांवर पूर्वी गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडल्यात. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करता येत नाहीत. त्यामुळे आता अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत. एस टी बस चालवताना गाडीत प्रथमोपचार पेटी आहे का, टूल किट आहे का त्याची तपासणी करावी. बस चालकांनी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये. वाहतूक नियमांचे पालन करावे. असे प्रतिपादन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आनंद शिंदे यांनी रत्नागिरी माळनाका येथील एस टी विभागाच्या कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रत्नागिरी माळनका येथे विभागीय कार्यालयात रस्ता सुरक्षा महिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी एस टी विभागाचे जिल्ह्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय वाहतूक अधीक्षक राजेश पाथरे, रत्नागिरी आगार व्यवस्थापक संदीप पाटील, आगार व्यवस्थापक कनिष्ठ बालाजी अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आनंद शिंदे यांनी आदर्श चालक तयार करणे, रस्ता सुरक्षेची गरज, प्रवास सुरू करण्यापूर्वी वाहनाची माहिती घेणे, वाहतुकीचे नियम, देशात किती टक्के अपघात होत आहेत, कोणकोणत्या प्रकारातील अपघात होत आहेत, अपघात घडल्यानंतर करावयाच्या उपाययोजना, महामार्ग मदत केंद्र, वाहन ब्रेक डाऊन झाल्यास घ्यावयाची काळजी, आदी विविध विषयांवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करून सविस्तर माहिती दिली.