‘भाजपाला ६ हजार कोटी, बाकीचे १४ हजार कोटी कुठे गेले?’, निवडणूक रोख्यांवर अमित शाह यांचा प्रश्न…

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी आणल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्याद्वारे देणगी देणाऱ्यांची नावे उघड केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

नवी दिल्ली- राजकीय क्षेत्रातून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना आणली गेली होती, असे प्रतिपादन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजनेवर बंदी घातल्यानंतर अमित शाह यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. “निवडणूक रोख्यांवर बंदी घातल्यामुळे आता काळा पैसा पुन्हा एकदा राजकारणात आणला जाऊ शकतो”, अशी भीती अमित शाह यांनी व्यक्त केली.

म्हणून निवडणूक रोखे योजना आणली…

भाजपाने २०१८ साली निवडणूक रोख्यांची योजना आणली होती, ज्यावर सर्वोच्च न्यायालयात नुकतीच बंदी घालण्यात आली आहे. अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मी भाष्य करू इच्छित नाही. पण राजकारणातून काळा पैसा हद्दपार करण्यासाठी निवडणूक रोखे योजना कशी आणली गेली, यावर चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. निवडणूक रोखे योजनेवर बंदी घालण्यापेक्षा त्यामध्ये सुधार आणला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.

अमित शाह पुढे म्हणाले की, निवडणूक रोखे योजना लागू होण्याआधी राजकीय पक्षांना रोख स्वरुपात देणग्या दिल्या जात होत्या. ही योजना लागू केल्यानंतर संस्था किंवा वैयक्तिक पातळीवर बँकेच्या माध्यमातून बाँड विकत घेण्याची आणि ते राजकीय पक्षांना देणगीस्वरुपात देण्याची पद्धत अमलात आणण्यात आली. भाजपा सत्तेत असल्यामुळे निवडणूक योजनेचा आम्हाला सर्वाधिक फायदा झाला, असा एक समज आहे. तसेच राहुल गांधी यांनी या योजनेला जगातील सर्वात मोठा खंडणी उकळण्याचा मार्ग असे म्हटले आहे. राहुल गांधींसाठी अशी भाषणं कोण लिहून देतं, हे माहीत नाही, अशी खोचक टीका अमित शाह यांनी केली.

बाकीचे १४ हजार कोटी कुठे गेले?….

भाजपाला केवळ ६००० कोटींचे निवडणूक रोखे मिळाले आहेत. सर्व राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण निवडणूक रोख्यांचा आकडा जातो २० हजार कोटींवर जातो. मग उरलेले १४ हजार कोटींचे निवडणूक रोखे कुणाकडे गेले? असा प्रश्न अमित शाह यांनी मुलाखतीमध्ये उपस्थित केला. तसेच निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपावर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांवरही अमित शाह यांनी टीका केली. ते म्हणाले, विरोधकांना मिळालेल्या देणग्या या त्यांच्या लोकसभेतील खासदारांच्या संख्येत अतिशय विषम आहेत.

काँग्रेस पक्षावर टीका करताना अमित शाह म्हणाले की, या योजनेआधी जेव्हा रोखीत देणग्या दिल्या जात होत्या. तेव्हा काँग्रेस पक्ष १०० रुपये पक्षाकडे आणि १००० रुपये स्वतःकडे ठेवत होता. यावेळी कोणकोणत्या पक्षाला किती रुपये मिळाले, याचीही आकडेवारी त्यांनी सादर केली. तृणमूल काँग्रेसला १६०० कोटी, काँग्रेस पक्षाला १४०० कोटी, भारत राष्ट्र समितीला १२०० कोटी, बीजेडी ७७५ कोटी आणि तमिळनाडूतील द्रमुक पक्षाला ६४९ कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page