
चिपळूण- रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाईच्या आदेशानंतर अलोरे शिरगांव पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची कारवाई करत गांजासह एक इसमाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे ₹१४,००० किंमतीचा ५८८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मा. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. अलोरे शिरगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील यांनी २७ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी (ता. चिपळूण) येथे ही कारवाई केली. पोलिस पथकात पोहेकाँ. गव्हाणे, यादव, पोकों. जगदाळे, फडतरे, माने, ग्रेड पोउनि लोटे, पोहेकाँ. शेख आणि मपोकाँ. मुल्ला यांचा समावेश होता. दोन पंचाच्या उपस्थितीत या ठिकाणी सापळा रचून संजय राया खरात (वय ३९, रा. पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी) याला गांजा विक्रीसाठी येताना अटक करण्यात आली.
त्याच्याकडून मिळालेल्या गांजाचे वजन ५८८ ग्रॅम असून त्याची अंदाजित किंमत ₹१४,००० आहे. या प्रकरणी अलोरे शिरगांव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६/२०२५ नोंदवण्यात आला असून, गुंगीकारक औषधी व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या या तत्परतेमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.