देवरूख महाविद्यालयाच्या अक्षय वहाळकर आणि सुयोग रहाटे यांची राष्ट्रीय युवा महोत्सवात दमदार कामगिरी…

Spread the love

देवरूख- पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना, पंजाब येथे संपन्न झालेल्या ३७व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात (हुनर: २०२४) मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या अक्षय शिवाजी वहाळकर आणि सुयोग चंद्रकांत रहाटे यांनी फाईन आर्ट (उपयोजित कला) या प्रकारात यश मिळवून दमदार कामगिरी केली.

अक्षय वहाळकर याने या राष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्ण आणि १ कांस्यपदक प्राप्त केले. अक्षय याने सलग दुसऱ्या वर्षी या राष्ट्रीय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून गतवर्षीप्रमाणे बहारदार कामगिरी केली. अक्षयने रांगोळी व कोलाज या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक, तर मांडणी शिल्प(इन्स्टॉलेशन) या सांघिक प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले. मांडणी शिल्प या कला प्रकारासाठी ‘आदिवासी संस्कृती’ या विषयावर अक्षयसह सुयोग रहाटे(आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख), आकाश स्थूल व कार्तिक कदम यांनी सादरीकरण केले होते. अक्षयने रांगोळीचे सुवर्णपदक मिळवताना ‘संस्कृती’ या विषयावर तर कोलाजकरिता ‘पोट्रेट’ हा विषय सादर केला होता. मुंबई विद्यापीठ संघाला सांस्कृतिक शोभायात्रेचे सुवर्णपदक प्राप्त झाले, यामधील सेट बनवण्यासाठी अक्षय आणि सुयोग यांनी मेहनत घेतली. मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाला डॉ. सुनील पाटील(संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, मुंबई विद्यापीठ) आणि निलेश सावे(सांस्कृतिक समन्वयक, मुंबई विद्यापीठ), यांच्यासह फाईन आर्ट प्रकारांसाठी केशर चोपडेकर आणि विलास रहाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

मुंबई विद्यापीठाच्या ५६व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने कलाशिक्षक सुरज मोहिते आणि विलास रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली फाईन आर्ट प्रकारात ४ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई केली होती. यामध्ये सुयोग रहाटे याने २ सुवर्ण व १ रौप्य पदक, तर अक्षय वहाळकर याने १ सुवर्ण व १ रौप्य आणि सिद्धी शिंदे हिने १ सुवर्णपदक प्राप्त केले होते. मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाचे प्रतिनिधित्व करताना ‘इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव: २०२३-२४’ मध्ये सुयोग रहाटे याने मातीकाम स्पर्धेत सुवर्णपदक, तर अक्षय वहाळकर याने रांगोळी व पोस्टर मेकिंगमध्ये कांस्यपदके मिळवली होती. ३७व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात अक्षय वहाळकर याने रांगोळीमध्ये सुवर्णपदक, तर कोलाजमध्ये रौप्यपदक आणि मांडणी शिल्प या सांघिक प्रकारात सुयोग रहाटेसह सुवर्णपदक प्राप्त करून राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवासाठी पात्रता सिद्ध केली होती.

महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी विलास विजय रहाटे यांनी केशर चोपडेकर यांच्यासह मुंबई विद्यापीठ संघाला मार्गदर्शन करताना घवघवीत यश मिळवून दिले. इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात २ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्य पदके पटकावून मुंबई विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करून देण्यास हातभार लावला. ३७व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात ३ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य पदक पटकावून मुंबई विद्यापीठाला फाईन आर्ट प्रकारातील सर्वसाधारण विजेतेपद मिळवून दिले. पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना, पंजाब येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठासाठी ३ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य पदके पटकावून मुंबई विद्यापीठाछा नावलौकिक वाढवला. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.विकास शृंगारे, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page