*नागपूर :* शपथ घेणाऱ्या मंत्र्याचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल, असं अजित पवार यांनी सांगून टाकलं आहे.
महायुती सरकारचा रविवारी नागपूरमध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या विस्तारामध्ये ४३ मंत्र्यांचा समावेश होणार असल्याची शक्यता आहे. भाजपला २१, शिंदे गटाला १२ आणि अजित पवार गटाला १० मंत्रिपदे मिळणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीर अजित पवारांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्याचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल, असं सांगून टाकलं आहे. त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्यानंतर अडीच वर्षानंतर पुन्हा एक शपधविधी होईल आणि नव्या चेहऱ्यांना महायुती संधी देईल, असं दिसून येत आहे.
मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, विदर्भात आपण ७ जागा लढलो. मोर्शी जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली. जर तसं झालं नसतं तर देवेंद्र भुयार निवडून आले असते. बुलढाणा जिल्हाध्यक्ष काजी यांचं अभिनंदन करतो. बुलढाणा बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ३०० कोटी रुपये देण्याची व्यवस्था केली.
“लोकसभेला मी तटकरे साहेबांना म्हणायचो तटकरे साहेब तुम्ही तरी तुमची लोकसभेची जागा काढा. जर आली नसती तर भोपळा मिळाला असता. तटकरे साहेब मला म्हणून शकत नव्हते तुमची जागा काढा म्हणून. मात्र त्यांनी जागा काढली. आम्ही मात्र त्यानंतर खूप बदल केले. मी माझा स्वभाव बदलला. जबाबदारी आली की माणूस बदलतो. मी ठरवलं आता कुणावर चिडायचं नाही. मी स्वभाव बदलला त्याचा परिणाम दिसला.” असे अजित पवार यांनी सांगितले .
अजित पवार पुढे म्हणाले की, फेब्रुवारी २०२२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणं गरजेचं होतं मात्र ३ वर्षे निवडणुका झाल्या नाहीत. आता अनेक निवडणुका होणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती, असे एकत्र बसणार आहेत आणि पुढची रणनीती ठरवणार आहेत.
“मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही. कही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे. आता ५ वर्षांत मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षे टर्म देण्यात येणार आहे. आमचं त्यावर एकमत झालं आहे. सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षांचा काळ मिळणार आहे.” असं अजित पवारांनी जाहीर करुन टाकलं.