जालना घटनेतील दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश : अजित पवार

Spread the love

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राहिल, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य, प्रयत्न करुया, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जाळपोळीच्या, हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली.
या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे.
दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्या राज्यातील संपत्तीचे नुकसान होत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेक, जाळपोळ हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मी मराठा समाज बांधवांना, मराठा संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन करतो की, राज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं.
राज्याच्या साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्या, बांधवांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तात्काळ थांबवला पाहिजे.
या घटना थांबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मराठा आंदोलक नेत्यांना, कार्यकर्त्यांना केले आहे. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page