पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे असं त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नेहमीच वाटतं. अनेकदा ते पोस्टर्स, बॅनर्सच्या माध्यमातून आपली इच्छा व्यक्त करत असतात. अजित पवार यांनीही आपली मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा बोलून दाखवली आहे. मात्र आता अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा व्यक्त केली आहे.
अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं का? या प्रश्नावर बोलाताना त्यांनी म्हटलं की, अजितदादांवर लोकांचा खूप प्रेम आहे. पण पुढचं काय सांगावं. सर्वांना वाटतं अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे. माझंही आता वय झालं आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यांसमोरच दादांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा आशाताई पवार यांनी बोलून दाखवली.
पुढे त्यांनी म्हटलं की, अजित पवार आजारी आहेत, त्यांना अशक्तपणा आला आहे. काटेवाडीत काहीच नव्हतं तेव्हापासून मतदान करत आहे. आता काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. लोकांचंही येथून खूप प्रेम मिळतं. अजित पवार यांची तब्येत ठीक नाही. त्यांना डेंग्यची लागण झाली आहे. त्यामुळे अजित पवार आज काटेवाडीत मतदान करण्यासाठी येणार नाहीत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार यांनी आज काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.
पुणे जिल्ह्यात २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीमध्ये भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. काटेवाडीत ग्रामपंचायतीच्या सर्व १६ जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे.