
मुंबई प्रतिनिधी : दोन दिवसांपूर्वी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांना खडे बोल सुनावणारे आणि नंतर दिलगिरी व्यक्त करणारे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आज पुन्हा नाशिक दौऱ्यावर आहेत. ते बागलान आणि सटाणा परिसरातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
या भागात दोन दिवसांपूर्वी जोरदार अवकाळी पावसामुळे कांदा, डाळ, टोमॅटो, गहू आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 4500 हेक्टरवरील शेती पिकांवर याचा परिणाम झाला असून, कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यापूर्वी नाशिकमधील द्राक्ष बागांच्या पाहणीदरम्यान कोकाटे यांनी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. आता पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते काय संवाद साधतात, याकडे लक्ष लागले आहे.