मुंबई/ प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुंबईत दोन उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत. हे दोन्ही उमेदवार दुसरे तिसरे कोणी नसून नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक हे आहेत.
हे दोघे जण जरी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असले तरी लेकीसाठी नवाब मलिक हे आपला पारंपारीक मतदार संघ सोडणार आहे. त्यांनी नव्या मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवारांच्या या खेळीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार आहे. तर महायुतीत भाजपला नवाब मलिक यांच्याबरोबर सना मलिक यांचाही प्रचार करावा लागणार आहे.*
नवाब मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते विद्यमान आमदारही आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते मंत्री ही होते.
मात्र दाऊद बरोबर संबध असल्याच्या आरोपावरून त्यांना जेलवारी करावी लागली होती. त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून दुर होते. त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर ही त्यांनी कोणतीही राजकीय भूमीका घेतली नाही.
सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यांना पक्षात घेऊ नये असे पत्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लिहीले होते. मात्र त्याकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दुर्लक्ष केले होते.
आता त्याच्या एक पाऊल पुढे जात अजित पवारांनी नवाब मलिक यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. ऐवढेचत नाही तर नवाब मलिक यांच्या बरोबर त्यांची मुलगी सना मलिक यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे.
त्यामुळे ज्या मलिकांना भाजपने, शिवसेना शिंदे गटाने टोकाचा विरोध केला त्यांचा प्रचार करण्याची वेळ या दोन्ही पक्षांवर येणार आहे. मात्र महायुतीतील हे पक्ष मलिक पिता पुत्रीचा प्रचार करतात की नाही याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नवाब मलिक हे अणुशक्तीनगर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. सध्या ते अजित पवार गटात आहे.
अजित पवारांनी नवाब मलिक यांना त्यांचा मतदार संघ सोडून शिवाजी नगर – मानखूर्द मतदार संघातून निवडणूक लढण्यास सांगितले आहे. त्यामुळे ते या मतदार संघात समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांना आव्हान देतील. अबू आझमी यांनी या मतदार संघात सलग तिन वेळा विजय मिळवला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदार संघातू शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांना निर्णायक आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभेला एकतर्फी वाटणारही ही निवडणूक नवाब मलिक यांच्या उमेदवारीने चुरशीची होणार हे निश्चित आहे.
एकीकडे नवाब मलिक हे आपला पारंपारीक मतदार संघ सोडून शिवाजीनगर- मानखुर्द विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढत आहेत.
त्याच वेळी त्यांची मुलगी सना मलिक या वडीलांच्या अणुशक्तीनगर मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. त्यांना याच मतदार संघातून उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाने निश्चित केले आहे. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी पवारांनी उमेदवारी दिल्याचे बोलले जाते.
सना मलिक या 23 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर 28 ॲाक्टोबरला नवाब मलिक शिवाजी नगर मानखूर्दमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील.