रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त केंद्र शासनाने देशव्यापी सुशासन सप्ताह सुरु केला आहे. प्रशासन जनतेसाठी काय करतंय, हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रलंबित कामांचा वेळेत निपटारा करावा, असे मार्गदर्शन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी केले.*
सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, तहसिलदार राजाराम म्हात्रे, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे म्हणाले, शहरीकरण जरी वाढत असले, तरी गावांमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ राहत असतात. येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणे, हे प्रमुख काम आहे. त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करणे, सार्वजनिक तक्रारी निर्गत करणे, ऑनलाईन सेवेमधील विलंबितता टाळून, त्या पुरविणे आदी गतीने कामे करावीत. सेवा हमीमधील अपिले वेळेत काम पूर्ण करुन विहित वेळेत तक्रारींचा निपटारा करा. त्याचबरोबर गतीने कामे करावीत.
प्र. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले, कार्यालयीन प्रलंबितता दूर करणे, हा या सप्ताहाचा मूळ उद्देश आहे. तक्रारदारांच्या टपालासाठी वर्गीकरण करा. त्यानुसार तक्रारींचे प्राधान्यक्रम ठरवा, त्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवा. तक्रारदारांचे अर्ज प्रथम निर्गत करणे आवश्यक आहे.
प्रास्ताविकेत उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे म्हणाल्या, ‘प्रशासन गाव की ओर ही’ थीम घेऊन सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. एकूण प्राप्त 269 तक्रारींपैकी 263 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. पीएमओपीजी पोर्टलवरील सर्वच्या सर्व प्राप्त तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सीपीजीआरएएमएस पोर्टलवरील प्राप्त 104 तक्रारींपैकी 103 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
या कार्यशाळेला समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, उपसंचालक निवास यादव, प्र.जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नायब तहसिलदार बजरंग चौगुले यांनी आभार प्रदर्शन केले.