महाडमध्ये एनडीआरएफ पथक दाखल, संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज!

Spread the love

महाडमध्ये एनडीआरएफ पथक दाखल, संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज!
संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 23 जवानांचे एनडीआरएफ पथक काल रात्री उशीरा महाडमध्ये दाखल झाले आहे.

महाड : संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 23 जवानांचे एनडीआरएफ पथक काल रात्री उशीरा महाडमध्ये दाखल झाले आहे. मागील काही वर्षातील आपत्तीचे स्वरूप पाहता पावसाळ्यामध्ये एनडीआरएफचे पथक महाडमध्ये ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहॆ.

रायगडमध्ये मुसळधार पावसाचा धोका कायम, आजही ऑरेंज अलर्ट; २६० घरांचे नुकसान, महावितरणलाही फटका
महाड नगर परिषदेच्या दस्तुती नाक्यावरील रमा विहारमध्ये कॅम्प लावला आहे. या पथकाकडे अद्ययावत उपकरणांसह चार फायबर बोटी, वायरलेस सेट, अन्यसामग्रीचा समावेश आहे. आगामी काळात ही टीम महाड पोलादपूर तालुक्यातील प्राधान्याने दरडग्रस्त, पूर प्रवण गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांमध्ये सुरक्षितते संदर्भात जागृती निर्माण करण्याचे कामही करणार आहे.

दरम्‍यान जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाने आपला जोर कायम ठेवला. जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटाने मुसळधार पाउस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. काही मार्गांवर झाडे पडल्याने त्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बुधवारसाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असल्याने मुसळधार पावसाचा धोका कायम आहे.

गेल्या चार दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर विश्रांती घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. गेल्या २४ तासात रायगडात १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने बुधवारसाठीही ऑरेज अलर्ट जारी केलेला आहे.

रायगडात अलिबाग, मुरुड, म्हसळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेले आहे. नुकसानीचे पंचमाने करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. महावितरणला या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. रायगडमध्ये पावसामुळे २६० पक्क्या घरांचे तर १३ कच्च्या घरांचे नुकसान झालेले आहे.

याशिवाय २ प्राथमिक आरोग्य केंद्रे, मच्छीमार सोसायटी, पोल्ट्री आदींनाही पावसाचा तडाखा बसला आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, पनवेल, पनवेल ग्रामीण, माणगाव आणि सुधागड पाली तालुक्यातील मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे. एक म्हैस आणि एका बकरीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असली तरी एकही नदी धोक्याच्या पातळीवर गेलेली नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page