
नागपूर :- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियान मृत्यू प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याविषयीची पहिल्याच दिवशी हिवाळी अधिवेशनात मोठी चर्चा असल्याने आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असून त्यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजप आमदारांकडून सातत्याने याप्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिशा सालियानच्या मृत्यूच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दिशाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या पुन्हा चौकशीला विरोध केला होता. आदित्य ठाकरे दिशाच्या मृत्यूच्या वेळी कुठे होते ? असा प्रश्न सातत्याने भाजप आमदारांनी उपस्थित केला होता. अशातच आता याप्रकरणी एसआयटीकडून आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार असल्याचे संकेत आहेत. आदित्य ठाकरे हे सध्या दुबईत असल्याची माहिती आहे.