‘आदिपुरुष’च्या कमाईने केला मोठा टप्पा पार; वादानंतरही थिएटर हाऊसफुल्ल!

Spread the love

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून वाद सुरू असतानाही बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडला दमदार कमाई झाल्याचं पहायला मिळालं. या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत जवळपास १२९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. रामायणावर आधारित हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाला ट्रोल करण्यात येत आहे. आदिपुरुषमधील कलाकारांचा लूक, त्यांचे डायलॉग्स आणि व्हीएफएक्स यावरून प्रेक्षकांनी टीका केली आहे. असं असतानाही थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी कायम आहे. रविवारी या चित्रपटाने ६५ कोटी रुपयांची कमाई केली.

आदिपुरुषने पहिल्या दिवशी जगभरात 140 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी 100 कोटींची कमाई झाली. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने जगभरात 240 कोटी रुपयांची दमदार कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटातील डायलॉग्सवर आक्षेप घेतल्यानंतर अखेर निर्माते-दिग्दर्शकांनी ते बदलण्याचा निर्णय घेतला. संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी ट्विट करत डायलॉग्स बदलणार असल्याचं स्पष्ट केलं. ‘मी आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांनी ठरवलंय की जे संवाद तुम्हाला खटकले आहेत, त्याविषयी आम्ही अभ्यास करू आणि या आठवड्यात सुधारित संवाद चित्रपटात समाविष्ट करू’, असं त्यांनी म्हटलंय.

मनोज मुंतशीर यांच्याकडून नाराजी व्यक्त

‘तीन तासांच्या चित्रपटात मी ३ मिनिटांसाठी तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळं काहीतरी लिहिलं असण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी माझ्या कपाळावर सनातन-द्रोही लिहिण्याची तुम्हाला इतकी घाई का झाली हे मला कळलं नाही. तुम्ही जय श्री राम गाणं ऐकलं नाही का? शिवोहम ऐकलं नाही का? राम सिया राम ऐकलं नाही का? आदिपुरुषमधील सनातनची ही स्तुतीही माझ्या लेखणीतूनच जन्माला आली आहे. तेरी मिट्टी आणि देश मेरे ही गाणीसुद्धा मीच लिहिली आहेत’, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘आदिपुरुष’ हा चौथा चित्रपट ठरला आहे. यामध्ये पहिल्या स्थानी RRR, दुसऱ्या स्थानी बाहुबली 2 आणि तिसऱ्या स्थानी केजीएफ 2 आहे.

RRR- 222 कोटी रुपये
बाहुबली : द कन्क्लुजन- 214 कोटी रुपये
केजीएफ : चाप्टर 2- 164.5 कोटी रुपये
आदिपुरुष- 140 कोटी रुपये

‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंहने शेष, सैफ अली खानने लंकेश आणि देवदत्त नागेनं बजरंग बलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page