
कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाळा, आयरे आणि गोलवली परिसरात बेकायदा चाळी उभारणीसाठी नव्याने बांधण्यात आलेले जोते आणि काही नवीन चाळी संबंधित प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या पथकाने जमीनदोस्त केल्या
पाऊस गेल्याने मागील काही महिन्यापासून शांत बसलेले भूमाफिया पुन्हा बेकायदा चाळी बांधण्यासाठी सक्रिय झाले आहेत. नव्याने एकही बेकायदा बांधकाम प्रभागांमध्ये होऊ नये आणि प्रभागातील कामकाजात शिस्त यावी यासाठी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी प्रभागांमध्ये शासन सेवेतील साहाय्यक आयुक्तांना नियुक्त केले आहे. या अधिकाऱ्यांच्या शिस्तबध्द कामकाज पध्दतीमुळे प्रभागातील फेरीवाले, बेकायदा बांधकामे, रस्त्यांवरील अतिक्रमणे विषय हे आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.
डोंबिवलीतील ग प्रभाग हद्दीत साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी आयरे गाव हद्दीत पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यांना आयरे हद्दीतील टावरे पाडा भागात बेकायदा जोते, चाळी उभारण्याची कामे चालू असल्याचे दिसले. ही बांधकामे बेकायदा असल्याने पालिकेच्या पथकाने टावरे पाडा भागातील १५ खोल्या, १९ जोते जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकले. दावडी, गोलवली भागात आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी चाळी आणि जोत्यांची कामे पथकाच्या सहायाने कारवाई करण्यात आली