
नेरळ (माथेरान): सुमित क्षीरसागर
माथेरानला लागूनच असलेल्या पेब किल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली महिला अचानक दरीत पडली.रेस्क्यू टीमच्या आणि माथेरान पोलिसांच्या अथक परिश्रमाने महिलेला सुखरूप दरीतुन काढण्यात यश आले.
माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असल्याने पर्यटक माथेरानमध्ये येत असतात.या पर्यटकांमध्ये ट्रेकिंगची आवड असणारे सुद्धा येतात अशाच ट्रेकिंगची आवड असणाऱ्या ग्रुपमध्ये एक महिला शनिवारी सकाळच्या सुमारास पेब किल्ल्याकडे ट्रेकिंग करत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती खोल दरीत पडली मात्र दरीत पडून सुद्धा ती महिला जिवंत होती.दरीतून ती वाचवा म्हणून ओरडत असताना पेब किल्यावर असणारी पुजाऱ्याने तो आवाज ऐकला आणि पोलिसांना खबर दिली माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी त्वरित सह्याद्री रेस्क्यू टीमला पाचारण केले.सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक, सुनील कोळी,चेतन कळंबे,संदीप कोळी,महेश काळे,अक्षय परब,सुनील ढोले यांनी टॉर्चसह दुपारी 1 वाजता सर्व रेस्क्यूचे साहित्य घेऊन थेट पेब किल्ला गाठला.सहाय्यक फौजदार गणेश गिरी,पोलीसनाईक घनश्याम पालवे,पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड,दामोदर खतेले,वन विभागाचे तात्पुरत्या स्वरूपात तैनात करण्यात आलेले कर्मचारी तसेच आदीवासी बांधव हे सुद्धा रेस्क्यू टीमच्या मदतीला होते.अंदाजे 700 फूट खोल दरीत अडकून पडलेल्या महिलेला धीर देत रॅपलिंगचे दोर दरीत सोडून अतिशय कठीण जागेतून त्या महिलेपर्यंत पोहोचले.तिला पूर्ण धीर दिल्यानंतर रस्सीला बांधून त्या महिलेला उंच दरीतून सुखरूप बाहेर काढले.सायंकाळी सहाच्या दरम्यान ती महिलेला मुख्य मार्गावर आणण्यात यश आले.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना विचारले असता आम्हाला माहिती मिळताच सहयाद्री रेस्क्यू टीमचे सहकारी घेऊन पेब किल्यावर गेलो.माथेरान पासून पेब किल्ला शहराबाहेर असल्याने अनंत अडचणींचा सामना करावा लागला.पायी चालत जाऊन त्या जागेचा आढावा घेऊन थोडं दरीमध्ये उतरून मग दोरीच्या सहाय्याने सह्याद्री रेस्क्यू टीमने सायंकाळच्या सुमारास महिलेला दरीतून सुखरूप बाहेर काढले.
• सह्याद्री रेस्क्यू टीमचे कौतुक
सहयाद्री रेस्क्यू टीमने निस्वार्थी पणाने आपल्या हातातील कामधंदा सोडून या महिलेला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.महिलेला सुखरूप दरीतून बाहेर काढण्यात सह्याद्री रेस्क्यू टीमचा मोठा वाटा असून त्या महिलेला जीवदान दिल्याबद्दल सर्व स्तरातुन या टीमचे कौतुक होत आहे.