
यवतमाळ | विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात एक अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. या गावात १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोबाईल वापरावर बंदी घालणारा हा पहिलाच निर्णय असल्याचे मानले जात आहे.
कोविड-19 संक्रमणादरम्यान, ऑनलाइन अभ्यासासाठी प्रत्येकाच्या हातात मोबाइल फोन होता. आता मुलांना या फोनचे व्यसन लागले आहे. आता स्मार्ट फोनवर अभ्यासाची जागा ऑनलाइन गेम्स किंवा सोशल मीडियाने घेतली आहे. मुलांचे हे व्यसन संपवण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील बन्सी नावाचे गाव आपल्या अनोख्या निर्णयामुळे चर्चेत आहे. या गावात किशोरवयीन व १८ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बन्सी गावचे सरपंच गजानन टाले म्हणतात, “निर्णयाची अंमलबजावणी करण्यात सुरुवातीला अडचणी येऊ शकतात, परंतु तो यशस्वी करण्यासाठी पालक आणि मुले दोघांनाही सल्ला दिला जाईल.” समुपदेशनानंतरही लहान मुले मोबाईल वापरताना पकडली गेल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मुलांना पुन्हा अभ्यासात आणणे आणि मोबाइल फोनमुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ न देणे हा त्याचा उद्देश आहे.