
वाँशिंग्टन- अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंतराळाशी संबंधित घटना आणि नवीनतम फोटो शेअर करत असते. नासाने नुकतीच आपल्या सोशल मीडियावर ‘कॉस्मिक ज्वेलरी’ नावाची खगोलीय घटना शेअर केली आहे. नासाच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेला हा ‘कॉस्मिक ज्वेलरी’ चा फोटो हबल स्पेस टेलिस्कोपने टिपला आहे. नेकलेस नेब्युला म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण पृथ्वीपासून १५ हजार प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहे. फोटो पाहताच प्रथमदर्शनी एखादा दागिन्यातील हारच जणू भासत आहे.
या चित्राबाबत नासाचे म्हणणे आहे की, ते सूर्यासारख्या जुन्या ताऱ्यांनी तयार केले आहे. पहिले दोन तारे एकमेकांभोवती फिरत राहिले. मग एक तारा विस्तारला आणि त्याच्या साथीदार ताऱ्याला घेरला. तथापि, लहान तारा त्याच्या साथीदार ताऱ्याभोवती फिरत राहिला.अशा प्रकारे ‘नेकलेस नेब्युला’ तयार झाला. नासाचे म्हणणे आहे की, तारे आणि वायूंचे हे कॉम्बिनेशन एखाद्या गळ्यातल्या हारासारखे दिसते. 13 मार्च रोजी पोस्ट केलेल्या या फोटोला आतापर्यंत 70 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यावर अनेक कमेंट्सही केल्या जात आहेत. लोक आश्चर्यचकित नजरेने या चित्राकडे पाहत आहेत.
अवकाशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या हळूहळू उजेडात येत आहेत. नासा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अलीकडेच, नासाच्या पर्सव्हरन्स रोव्हरने सूर्यासमोरून जाणारा लाल ग्रहाचा चंद्र ‘फोबोस’ कॅप्चर केला आहे. म्हणजेच मंगळावर सूर्यग्रहणाची परिस्थिती असल्याचे यातून सिद्ध झाले होते. 1877 मध्ये अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ असफ हॉल यांनी फोबोसचा शोध लावला होता. हा एक लघुग्रह आकाराचा चंद्र आहे, जो मंगळाच्या पृष्ठभागापासून काही हजार किलोमीटर अंतरावर प्रदक्षिणा घालतो. असे म्हटले जाते की, तो मंगळावरच तुटत राहतो आणि एक दिवस लाल ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो पूर्णपणे तुटतो.