
नेरळ : सुमित क्षीरसागर – भारताच्या १८ व्या लोकसभेची निवडणूक देशात सुरु आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. तर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची लगबग सुरु झाली आहे. ३३ मावळ लोकसभा हा मतदारसंघ तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे आता पर्यंत ४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरली आहेत. तर आतापर्यंत एकूण १२५ नामनिर्देशनपत्र नेण्यात आली आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २२ एप्रिल रोजी विहित वेळेत ३ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. यामध्ये भारतीय जवान किसान पार्टी उरणचे प्रशांत रामकृष्ण भगत, शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग चंदू बारणे तसेच खोपोली येथील इंद्रजीत डी. गोंड यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तर दिनांक १९ एप्रिल रोजी क्रांतिकारी जय हिंद सेनेचे यशवंत विठ्ठल पवार यांमहायुतीचे उमेदवार शिरंग बारणे यांनी नामनिर्देशन सादर करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले तर यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, आमदार अश्विनी जगताप, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, महेंद्र थोरवे, सुनील शेळके आदी उपस्थित होते.
दरम्यान, आज दिनांक २२ एप्रिल रोजी एकूण १७ व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून ३३ नामनिर्देशन पत्र नेले आहेत. त्यामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा समावेश आहे. तर आजपर्यंत एकुण ६६ व्यक्तींनी १२५ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.

