मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत पावणेचार किलो वजनाचे सोने जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये असून याप्रकरणी वसईमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
या तस्करीमागे श्रीलंकन टोळीचा सहभाग असून आरोपीने गेल्या एक महिन्यांत १० वेळा सोने विमानतळाबाहेर काढल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. सीमाशुल्क विभागाने संशयावरून विमानतळ प्रवेशिका असलेल्या अनिल सिंहला ताब्यात घेतले. त्याने घातलेल्या कपड्यांची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या खिशामध्ये विविध रंगाचे मोजे सापडले. ते तपासणे असता त्यात तीन किलो ६०० ग्रॅम वजनाचे १० लगड सापडले. श्रीलंकन नागरिक असलेल्या व्यक्ती ते सोने एका मोबाईल केंद्रावर ठेवले होते. तेथून आरोपीने ते उचलले. ते पाकीट त्याला अण्णा नावाच्या व्यक्तीला सुपूर्त करायचे होते. पण त्यापूर्वीच त्याला अटक झाली.
आरोपी अनिल सिंहने तस्करी करून आणलेले सोने गेल्या महिन्याभरात १० वेळा विमानतळाबाहेर काढले आहे. या सर्व तस्करीमागे श्रीलंकेतील नागरिक असलेल्या टोळीचा संबंध आहे. ही टोळी परदेशातून सोन्याची तस्करी करून भारतात आणते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे सोने इतर साथीदारांना देण्यात येते. त्यानंतर या टोळीचे साथीदार देशांतर्गत विमानतळातून हे सोने बाहेर काढतात. गेल्या दोन महिन्यांमध्ये अशा किमान १५ व्यक्तींना अटक करण्यात सीमाशुल्क विभागाला यश आले आहे.