
राजापूर/ प्रतिनिधी- राजापूर: राजापूर तालुक्यातील मौजे सागवे येथूल निखारेवाडी येथील कांदळवन वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. अखिल भारत हिंदू महासभेचे राज्य सरचिटणीस स्वप्नील खैर यांनी याबाबत अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार केली आहे. आम्ही कांदळ वनसंरक्षक, विभागीय वन अधिकारी, कांदळ वन विभाग दक्षिण कोकण यांच्याकडेही तक्रार केली आहे, परंतु सर्वजण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कत्तल होत असूनही, वन विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. या कांदळवन वधात अनेकांचे हात खराब झाले आहेत असे खैरे म्हणतात.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सागवे निखारेवाडी येथे कांदळ वन वृक्ष तोडून कोळंबी संवर्धन प्रकल्प सुरू केला जात आहे. या प्रकल्पासाठी कांदळ वन वृक्ष तोडण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी. तसेच, त्या ठिकाणी उत्खननादरम्यान शिवकालीन एक तोफ देखील सापडली आहे. ती तोफ त्याच वाडीत मंदिरासमोर ठेवली आहे. या संदर्भात पुरातत्व विभागाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच त्यांनी सांगितले की, सदर प्रकल्प सुरू करणाऱ्या जमीर निजामुद्दीन खलिफा आणि माजी विधान परिषद सदस्य हुस्नाबानो खलिफा (भारतीय काँग्रेस) यांच्यावर फौजदारी खटले दाखल करावेत. अशी मागणी सदर निवेदन मार्फत करण्यात आली आहे.


सरकारी जमीन भाडेतत्त्वावर घेऊन सदर जमिनीवरती प्रोजेक्ट करण्यात आलेले आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून सदरची जमीन तीस वर्षाकरिता भाडे तत्त्वावर घेण्यात आलेले आहे. कोणतेही प्रोजेक्ट करताना संबंधित एजन्सीची परमिशन घेणे गरजेचे असताना कोणतेही परमिशन न घेता झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. प्रशासना सदर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खैरे यांनी सदरची तक्रार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, प्रधान सचिव, वन विभाग, वनमंत्री, पुरातत्व आणि संग्रहालये संचालनालय, प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य मंत्री, मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री यांना देण्यात आली आहे.

