
महाराष्ट्र; बुलढाणा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्याने मित्रानेच आपल्या जीवलग मित्राची हत्या केली आहे. लोणार तालुक्यातील पळखेडा गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे
राजाराम गजानन जायभाये, असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संतोष मदन थोरावे (वय ३४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष आणि मृत राजाराम जीवलग मित्र होते. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते.
यादरम्यान, आरोपी संतोष याचा राजारामच्या पत्नीवर जीव जडला. कालांतराने दोघे जवळ आले. मात्र, या गोष्टीची कुणकुण राजाराम याला लागली. अनैतिक प्रेम संबंधात अडसर ठरत असल्याने संतोष याने राजारामचा काटा काढण्याचा प्लान आखला. २९ ऑक्टोबरला राजाराम शेतात नांगरणी करण्यासाठी गेला होता.

सायंकाळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे गावातील व्यक्तींनी राजारामची शोधाशोध केली. यावेळी राजाराम हा संतोष थोरवे याच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान, राजाराम याने शेतात जाऊन आत्महत्या केल्याची वार्ता गावात पसरविण्यात आली . मात्र, याबाबत मृतकचे वडील गजानन जायभाये यांना संशय आला.
आपला मुलगा आत्महत्या करणार नाही, त्याचा कुणीतरी खून केला आहे, असा संशय घेत गजाजन यांनी लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी आरोपी संतोष याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवल्या असता, आपणच राजारामची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.
जाहिरात
