पुणे- वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून सातत्याने मागणी करुन देखील आळंदीतील इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांविरोधात अद्याप सरकारने कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता फेसळलेल्या इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करुन वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागणार आहे. त्यामुळे येथील वारकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर एका ही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही. असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिला आहे. आषाढी वारीसाठी लाखो वारकरी श्री क्षेत्र आळंदी येथे दाखल होत आहेत. मात्र, इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची वारंवार मागणी करुनही सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी चिंचवडमधील काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आता आषाढीसाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असताना देखील इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रशासनाला पार पाडता आलेली नाही, असा आरोप देखील करण्यात येत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आता काही तासांवर..
आळंदीमधील इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करुन वारकरी माऊलींच्या चरणी माथा टेकवतात. मात्र, इंद्रायणी नदीमधील प्रदुषणामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. एकिकडे आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान देणार, ही घोषणा करणारे सरकार वारकऱ्यांच्याच जीवाशी खेळतेय का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. तरी देखील इंद्रायणी नदी प्रदुषणामुळे फेसाळलेली आहे. प्रस्थानापूर्वी इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घेतला नाही, तर एकाही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही. असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिला आहे.