
मुंबई | फेब्रुवारी २८, २०२४.
“सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मा. पणन मंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या दालनात कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न संपूर्ण ताकदीने मांडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली कोकणातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काजूला ‘भावांतर योजनेंतर्गत शासकीय अनुदान’ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी एकमुखाने केली.” अशी माहिती भाजपा नेते, मा. आमदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार यांनी विधानसभा भवनाच्या समोरून एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली.
यावेळी ना. दीपकभाई केसरकर, आम. नितेशजी राणे, आम. निरंजन डावखरे, मा. आम. राजनजी तेली यांनी उपस्थित राहून या मुद्द्याचे गांभीर्य मा. मंत्री महोदयांना समजावून सांगितले. अत्यंत संवेदनशीलपणे हे अनुदान उपलब्ध करून काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न करावेत आणि गोव्याच्या धर्तीवर हे अधिवेशन संपण्यापूर्वी आमच्या मागणीला मान्यता द्यावी असा आग्रह धरला. उपस्थित तीनही मंत्री अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा घडवून आणतील आणि कोकणातील शेतकऱ्यांना न्याय्य अनुदान देण्यासाठी प्रयत्न करतील असे आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिले.
“गेले अनेक दिवस सातत्याने पाठपुरावा करत असल्याने, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीचा विषय याच अधिवेशनात पटलावर आणण्यात यश प्राप्त झाले आहे. विद्यमान खासदार या गोष्टींचा कधीही अभ्यास करत नसल्याने शेतकऱ्यांना झालेला त्रास यापुढे होणार नाही यासाठी मी आग्रही प्रयत्न करत असून याचा फायदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे व्यक्तीशः मी समाधानी आहे.” असे प्रतिपादन श्री. प्रमोद जठार यांनी केले.